Pune: व्हॉट्सएपकडून ‘फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड मेसेज’ना ‘ब्रेक’! यापुढे एका वेळी एकाच चॅटला होणार मेसेज फॉरवर्ड!

कोविड-19 बाबत अफवा रोखण्यासाठी कडक उपाययोजना

एमपीसी न्यूज – कोविड-19 बाबत पसरविल्या जाणारी चुकीची माहिती व अफवांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी व्हॉट्सएपने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे सातत्याने फॉरवर्ड केले गेलेले मेसेज तुम्ही व्हॉट्सएपवरून एकावेळी पाच चॅटवर नव्हे तर एका वेळी एकाच चॅटवर फॉरवर्ड करू शकणार आहात. तुम्ही संंबंधित मेसेज प्रत्येक वेळी कॉपी करून चॅट बॉक्समध्ये पेस्ट करून कितीही वेळा पुढे पाठवू शकता, मात्र त्यासाठी आता अधिक वेळ आणि कष्ट लागणार आहेत. 

‘एनडीटीव्ही’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. पूर्वी व्हॉट्सएपवर एका वेळी एक मेसेज कितीही जणांना फॉरवर्ड करण्याची मुभा होती. त्यातून मोठ्या प्रमाणात व अतिशय जलद गतीने अफवा अथवा चकीची माहिती पसरविली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर व्हॉट्सएपने एका वेळी एक मेसेज जास्तीत जास्त पाच क्रमांक, पाच ग्रुप अथवा पाच ब्रॉडकास्ट ग्रुपवर फॉरवर्ड करण्याची मर्यादा घातली. त्यामुळे एखादी पोस्ट व्हायरल होण्यासाठी लागणारा वेळ व त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट वाढल्याने स्वाभाविकपणे मेसेज फॉरवर्डिंग कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

कोरोना प्रसार रोखण्यासाठी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहेत. लोकांना घरी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांकडे मोकळा वेळ मोठ्या प्रमाणात असल्याने व्हॉट्सएपवरील मेसेजच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मेसेजच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात असल्याचे लक्षात आले. समाजाच्या दृष्टीने हे घातक असल्याने व्हॉट्सएपवर सातत्याने म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड झालेला मेसेज किंवा पोस्ट एका वेळी एकाच चॅटवर म्हणजे एकाच नंबरवर, एकाच ग्रुपवर अथवा एकाच ब्रॉडकास्ट लिस्टला फॉरवर्ड करण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला लागणारा वेळ पाचपटींपेक्षा जास्त लागणार आहे. त्यामुळे व्हॉट्सएपधारक देखील आवश्यक तेवढेच मेसेज फॉरवर्ड करतील व अनावश्यक मेसेज कमी होतील, असे गणित त्यामागे मांडण्यात आले आहे. एखादी अफवा रोखण्यासाठी पोलिसांना व प्रशासनाला देखील पुरेसा वेळ मिळू शकणार आहे.

यापूर्वी मेसेज फॉरवर्डिंगसाठी पाच चॅटची मर्यादा घालण्यात आल्याने एकूण मेसेजची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे व्हॉट्सएपने म्हटले आहे. व्हॉट्सएपने अलिकडेच फॉरवर्डेड मेसेज व्हेरिफाय करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. नव्या नियमामुळे वव्हॉट्सएपवरील मेसेजची संख्या किती घटते, याबाबत उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे उत्तर काही दिवसात मिळू शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.