New Delhi: नक्की ड्रामेबाज कोण? निर्मला सीतारामन की राहुल गांधी?

New Delhi: Who exactly is a 'Dramebaj'? Nirmala Sitharaman's Rahul Gandhi?

एमपीसी न्यूज – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदांची ‘ड्रामेबाज’ म्हणून केलेली संभावना सीतारामन यांना चांगलीच झोंबल्याचे आज जाणवले. आजच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सीतारामन यांनी राहुल गांधी हेच ड्रामेबाज असल्याचा प्रत्यारोप केला. त्यामुळे नक्की ड्रामेबाज कोण, यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. लॉकडाऊनमध्ये वाहनांची सोय होत नसल्याचा आरोप करीत अनेक स्थलांतरीत मजुरांनी आपल्या बायका-मुलांसाठी शेकडो-हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांकडे पायी चालत जायला सुरूवात केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. केंद्र शासनाकडून नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. दररोज पत्रकार परिषदा घेऊन नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. दररोज ड्रामेबाजी सुरू आहे, अशा अशयाची टीका केली होती. त्या टिकेविषयी सीतारामन यांना छेडले असता त्या चांगल्याच भडकल्या.

राहुल गांधी यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या, पंतप्रधानांनी आधीच सर्व स्थलांतरित मजुरांना आहात तिथे थांबवण्याचे आवाहन केले होते. केंद्र शासनाकडून शक्य होती तेवढी मदत त्यांना करण्यात येत आहे. त्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था शासन तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

तरीही घरी जायचं असेल तर त्यांच्यासाठी रेल्वे खात्याने विशेष श्रमिक ट्रेन्सची व्यवस्था केली आहे. सर्वांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. प्रवासातील खाण्या-पिण्याची सोय देखील केली जात आहे. तरीही अनेक स्थलांतरीत मजूर रस्त्याने पायी जात आहेत, याचे दुःख वाटते.

काँग्रेसची सत्ता असलेली किंवा त्यांच्या मित्र पक्षांची सत्ता असलेली राज्ये जादा श्रमिक ट्रेन का मागवत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. पायी चालणाऱ्या मजुरांविषयी खरंच कळवळा असता तर त्यांनी त्यांचे सामान, मुले उचलून त्यांच्याबरोबर चालत संवाद साधला असता. ते सोडून एका जागी बसवून मजुरांचाही वेळ वाया घालवणे, ही ड्रामेबाजी नाही का, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला.

स्थलांतरितांसाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा सीतारामन यांनी व्यक्त केली. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात मजुरांना सगळ्या सुविधा मिळत आहेत का, असा सवाल त्यांनी केला. सगळ्या सुविधा मिळत असतील तर हे मजूर स्थलांतरित का होत आहेत, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, असेही त्यांनी सुनावले.

ही काय पद्धत आहे, हे काय राजकारण आहे, असा संतप्त सवाल सीतारामन यांनी केला. स्थलांतरितांविषयी काँग्रेसने राजकारण करू नये, जबाबदारीने बोलावे, अशी आपली काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना विनंती आहे, असे त्या शेवटी म्हणाल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.