New Delhi : केंद्र शासनाच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून कोणाला काय मिळणार? अर्थमंत्र्यांची आज दुपारी पत्रकार परिषद

New Delhi: Who will get how much from central government's Rs 20 lakh crore package. Finance Minister will announce in the press conference today Afternoon

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या 20 लाख कोटी रुपयांच्या विषेश पॅकेजमधून कोणाला, किती आणि कसे मिळणार, याबाबत सर्व देशवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. सर्वांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज (बुधवारी) दुपारी चार वाजता नवी दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेत देणार आहेत. 

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेले 20 लाख कोटी म्हणजे भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नाच्या (GDP) 10 टक्के एवढे हे पॅकेज आहे. या पॅकेजमुळे देशातील सर्व घटकांना फायदा होणार असून आत्मनिर्भर अभियान भारत पॅकेजमुळे देशाला नवी गती मिळणार आहे. कोरोना भारतात संधी घेऊन आला आहे. जगातले सर्वात उत्तम टॅलेन्ट भारतात असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पॅकेजचा समावेश असणार आहे. या विशेष पॅकेजच्या माध्यमातून देशातील विविध घटकांना, आर्थिक व्यवस्थेला 20 लाख कोटी रुपयांचे पाठबळ मिळणार आहे. या पॅकेजमुळे 2020 मध्ये देशाच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या विकासाच्या प्रवासाला नवीन वेग मिळेल, असेही मोदी यांनी सांगितले आहे.

आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी या पॅकेजमध्ये सर्व स्तरावर जोर देण्यात आला आहे. या आर्थिक पॅकेजच्या मदतीने लघुउद्योग, मध्यम उद्योग, गृहोद्योगांना फायदा होईल. देशातील श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज आहे, जे प्रत्येक परिस्थितीत देशवासियांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. प्रामाणिकपणे कर भरतात आणि देशाच्या विकासात योगदान देतात त्या देशातील मध्यमवर्गासाठी हे पॅकेज आहे, असे पंतप्रधानांनी सूचित केले आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांपासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत. केंद्र शासनाच्या या पॅकेजमधून कोणाला, किती व कसे आर्थिक पाठबळ मिळणार, हे जाणून घेण्यासाठी दुपारी चार वाजता होणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेची वाट पाहावी लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.