New Delhi: चिंताजनक! देशात एका दिवसांत 3,053 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 50 हजारांचा टप्पा

गेल्या तीन दिवसांत दररोज तीन हजार पेक्षा अधिक रुग्णांची भर, समूह संसर्गाच्या प्रश्नावर आरोग्य मंत्रालय प्रवक्त्याचे मौन

एमपीसी न्यूज – देशातील आज एका दिवसात 3,053 नव्या कोरोना रुग्णांची तर 87 मृत्यूंची नोंद झाली. कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या तीन दिवसांपासून दररोज तीन हजारांपेक्षा अधिक भर पडल्याने भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. भारतात समूह संसर्ग सुरू झाला आहे का, या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांने मौन बाळगले. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आज 50 हजारांचा टप्पा ओलांडला. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 52 हजार 458 झाली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण 12 लाख 76 हजार 781 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 52 हजार 458 चाचण्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1,781 पर्यंत वाढला आहे, तर आतापर्यंत देशात 14 हजार 911 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाचे 35 हजार 762 रुग्ण आहेत.

समूह संसर्गाच्या प्रश्नाला आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याची बगल

करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने समूह संसर्ग सुरू झाला आहे का, या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढले पाहिजे. प्रतिबंधित भाग आणि अन्य ठिकाणीही श्वसनाच्या गंभीर आजाराची लक्षणे व्यक्तींमध्ये दिसत आहेत का, यावर देखरेख ठेवली पाहिजे, असे अगरवाल यांनी सांगितले.

स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्याची केंद्राने परवानगी दिल्यानंतर चार दिवसांमध्ये विविध राज्यांतून 62 विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या. त्यातून 72 हजार मजुरांनी प्रवास केला. आणखी किमान 13 रेल्वेगाडय़ा सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. राज्यांकडून होणाऱ्या मागणीनुसार विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत आरोग्यमंत्र्यांना चिंता

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे, याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकार राज्यांनी केलेल्या उपाययोजनांचा पाठपुरावा करत आहे. ज्या भागात कोरोनाचा सामना करण्यात राज्यांना अडचणी येत आहेत, तेथे आवश्यक पाठिंबा देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आपल्या सर्वांसाठी एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 34 जिल्हे कोरोनाबाधित झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजर 541 वर गेला आहे., तर 583 लोक मरण पावले आहेत, ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 34 जिल्ह्यापैकी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यामधील स्थिती बिकट आहे. तर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात कोरोना एकही रुग्ण नाही याबद्दल आनंद असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

गोंदिया आणि उस्मानाबादमध्ये गेल्या 28 दिवसांपासून नवीन रुग्ण आढळले नाहीत. गेल्या 21 दिवसांत बीडमध्ये कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाहीत. गेल्या सात दिवसांपासून अहमदनगर व भंडारा येथे कोणतेही नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले नाहीत. सर्व जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये रुपांतरित करण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य होईल, असे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.