New Delhi : गर्दी टाळण्यासाठी २२ मार्चला देशभरात जनता कर्फ्यू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी देशातील जनतेने २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू  करावा , अशी महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( गुरुवारी ) केली. जनतेसाठीच्या या कॅफ्युची अमंलबजावणी करून कोरोनाचा सामना करण्यासाठी देशाची सज्जता असल्याचे जनतेने दाखवून द्यावे,  असे आवाहनही पंतप्रधानांनी या वेळी केले.

जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःने स्वतःवर लादलेली बंधने. त्याचे पालन सर्व देशवासीयांनी करावे. त्यामुळे २२ मार्चला रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्याचवेळी अत्यावश्यक सेवांना या कर्फ्युमधून वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील सर्व राज्य सरकारांनीही या कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

कोरोनावर अद्याप कोणत्याही लसीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे देशवासीयांची चिंता वाढत आहे. हे स्वाभाविकही आहे. मात्र, कोरोनाचे संकट साधेसुधे नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संयम ठेवून सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन  करीत नागरिकांनी रुग्णालयांचा ताण वाढवू  नये, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या संकटाचा भारतीयांनी प्रभावीपणे सामना केला, ही बाब कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केले. जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी निश्चिन्त राहण्याची ही वेळ नाही.  त्यामुळे प्रत्येकाने जागरूक रहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना केले.

रविवारी संध्याकाळी 5 वाजता देशवासियांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी. त्यासाठी लोकांनी आपल्या दारात, खिडकीजवळ किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून टाळ्या, थाळी किंवा घंटा वाजवून आभार मानावेत, असे आवाहनही पंतप्रधानांनी देशवासीयांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.