Pune : बहुमतापेक्षा वेगळे होणे, हे सोवळेपणाचे लक्षण; डॉ. सदानंद मोरे यांचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज यांचा सोवळ्याला विरोध होता. बहुमतापासून वेगळे होणे हे सोवळेपणाचे लक्षण असून जिथे बहुमत चुकते तिकडे आपण वाहत जायचे नाही, अशा शब्दांत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शिवसेना – भाजपवर हल्लाबोल केला.

रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान आयोजित प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार आणि कृतज्ञता पुरस्कार प्रदान समारंभ 2019 एस. एम. जोशी सभागृहात आज आयोजित केला होता. ह. भ. प. दिनकर भुकेले – शास्त्री यांना जीवन गौरव पुरस्कार तर, माजी आमदार उल्हास पवार यांना कृतज्ञता पुरस्कार अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ह. भ. प. विठ्ठल पाटील, संत साहित्याचे अभ्यासक, 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, देहू देवस्थानचे अध्यक्ष, ह. भ. प. मधुकर महाराज मोरे, ह. भ. प. शेखर महाराज कुटे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थापक हरीश चिकणे, अध्यक्ष अभिनंदन थोरात, मीरा चिकणे – देशमुख, कांचन थोरात, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोपकर उपस्थित होते. संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, नेते घडविण्यात रामकृष्ण मोरे यांचा मोठा वाटा होता. उल्हास पवार आणि दिनकर भुकेले – शास्त्री यांचे कार्य मोठे आहे. या दोघांनाही त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार महत्वाचा आहे. पुढील वर्षी आणखी चांगल्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अभिनंदन थोरात म्हणाले, आम्हाला प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नावाने संस्था काढायची आहे. कितीही संकटे येवोत, मोरे सर नेहमी हसतहसत सामोरे जायचे. सध्या प्रेम, जिव्हाळा कमी होत चालला आहे. केवळ स्वार्थी भावना वाढत आहे.

उल्हास पवार म्हणाले, कृतज्ञता पुरस्कार हे माझे भाग्य समजतो. विचार मंडणाऱ्यांची संख्या जास्त, मात्र आचरण करणाऱ्यांची संख्या कमी आहे. केंद्रीय मंत्री माझ्या ओट्यावर बसलेले मी बघितले आहेत. काँग्रेसमध्ये अनेक माणसे मोठी होतांना मी बघितली. व्यासंगपेक्षा सत्संग महत्वाचा असून त्यातून माणूस मोठा होतो. गांधी हे माझे दैवत आहे. असे सांगून रामकृष्ण मोरे, विलासराव देशमुख यांच्या आठवणी जगविल्या.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक ही वक्तृत्व असलेला नेता नाही. इंदिराजी कोणत्याही संकटाला घाबरत नव्हत्या. ते मी स्वतः बघितले आहे. शायर सादर करताना मला शाबासकी मिळाली. पी. चिदंबरम, गुलाबनामी आझाद हे माझे सहकारी होते. रामभाऊ मोरे यांच्या निधनानंतर मी आणि विलासराव सातत्याने चर्चा करीत असे. मोरे आणि विलासराव यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. रामभाऊ हे उत्कृष्ट वक्ता व प्राध्यापक होते, असेही उल्हास पवार यांनी सांगितले.

दिनकर भुकेले शास्त्री म्हणाले, वारकरी संप्रदायात वैष्णव शब्दाचा वापर जास्त आहे. भारतात 6 हजार जाती निर्माण होऊन त्यात हिंदू समाज वाटल्या गेला. वारकरी साहित्याने समाज भान जागे केले. आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी पुरस्कार दिल्याने मला आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. संत तुकाराम महाराज यांनी समाज जागृतीचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.