Pune : बाणेर येथील पॅनकार्ड क्लबला भीषण आग; अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

एमपीसी न्यूज – पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लबच्या डोमला आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. स्थानिकांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती कळविल्यानंतर अग्निशामक दलाचे 5 बंब आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. 

बाणेर रोड येथील पॅनकार्ड क्लब सध्या काही कारणास्तव बंद आहे. या क्लबमध्ये हॉटेल, इमारती, राहण्यासाठी 55 खोल्या आहेत. तर इमारतीला समोरील बाजूला सुशोभिकरण केले आहे. याठिकाणी आज दुपारी अचानक आग लागली. आतमध्ये फायबर, स्टील, तसेच आग पकडणारे मोठे सामान असल्याने थोड्याच वेळात आग मोठ्या प्रमाणात भडकली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसरसह 15 सेवकांनी 5 बंब आणि पाण्याचे 11 टँकरच्या सहाय्याने तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोलरूम कडून पाषाण येथून फायर गाडी सोडण्यात आली. त्यानंतर कोथरूड फायर स्टेशन येथून आणि सेंट्रल फायर स्टेशन येथून दोन गाड्या पाठविण्यात आल्या. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. कोथरूडचे ऑफिसरांनी कंट्रोल रुमला हायड्रोलिक फ्लैटफॉर्म मागितले होते. मात्र, मागणी करूनही कंट्रोल रूमने हायड्रोलिक फ्लैटफॉर्म पाठविले नाही, ते मिळाले असते तर आग लवकर आटोक्यात आणता आली असती, अशी खंत ऑफिसर पाथरूडकर यांनी बोलून दाखविली. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर एक ते दीड तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.

पॅनकार्ड क्लब हा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण कळाले नाही. येथे यापूर्वीही आग लागली होती. तर काही जण इन्शूरन्सचे पैसे मिळविण्यासाठी मुद्दाम आग लावत आहेत, अशी शंका परिसरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.