Urse Tolnaka : द्रुतगती मार्गावर लुटमार करणा-यांची टोळी सक्रीय; टेम्पो चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकास चार अज्ञात चोरट्यांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याच्याजवळील ६१ हजार ७०० रुपये आणि एटीएम कार्ड लुटले. लुटमारीचा हा प्रकार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्या जवळील पेट्रोल पंपालगत शुक्रवारी (ता. १२) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते. यासंदर्भात हजरात कासिमसाब बुर्ली (४८, हिरेमसळी, ता. इंडी, जि.विजापूर, कर्नाटक, सध्या रा. भिवंडी, पडघा, ठाणे) या टेम्पोचालकाने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेमुळे द्रुतगती महामार्गावर लूटमारी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हजरत बुर्ली हे त्यांचा टेम्पो (क्र.एम एच १२ एम व्ही ७८६९) मुंबईहून हैद्राबादकडे जात असता, उर्से टोलनाक्याजवळील एका पेट्रोल पंपानजीक लघुशंका करण्यासाठी थांबले असता अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी टेम्पो चालक बुर्ली यांना  लाथाबुक्याने मारहाण करून ६१ हजार ७०० रुपायांसह एक एटीएम जबरीने चोरुन नेले.

पुढील तपास  पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.