New Historical Movie : पावनखिंडीतला थरार झळकणार आता मोठ्या पडद्यावर

The thrill of Paavan khind will now shine on the big screen

एमपीसी न्यूज – एका मराठी वीराच्या अतुलनीय पराक्रमाने गाजलेल्या एका खिंडीला कायमची वेगळी ओळख मिळाली. घोडखिंडीची झाली पावनखिंड आणि ते वीर म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. 13 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा…  मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय याच दिवशी घोडखिंडीत लिहिला गेला. अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा हा ठसठशीत वस्तुपाठ जगासमोर साकारला गेला. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.  

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठेशाहीच्या इतिहासातील शूर योद्धांचा ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे पोहचविल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तसेच सोमवारी १३ जुलै रोजी याचा फर्स्टलुक देखील प्रदर्शित होणार आहे.

निस्पृह स्वामीनिष्ठा आणि अजोड पराक्रमाचे प्रतीक म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. पन्हाळगडाला सिद्दी मसूदने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केले. पाठलागावर असलेल्या विजापुरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. एकीकडे मुसळधार पडत असलेल्या पावसातही हजारोंच्या सैन्याचा मुकाबला फक्त सहाशे मावळ्यांसह करताना बाजी आणि बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली.

 

या अविस्मरणीय पराक्रमाचा हा अध्याय ‘जंगजौहर’ या ऐतिहासिकपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थी पडले.

View this post on Instagram

तिसरे शिवपुष्प महाराष्ट्राचा शिवशंकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करायला निघालो आहे… आशीर्वाद असो द्यावा…🙏 "श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला" नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अभूतपूर्व पराक्रमाची शौर्यगाथा… 'जंगजौहर', आईभवानी, जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आमचं सिनेमारूपी पुष्प श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन चरणी अर्पण करीत आहोत… आमच्या सर्व मावळ्यांसोबत हे त्रिदळ महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण हर हर महादेव🚩🚩🚩 #जंगजौहर #JungJauhar #AAFilms In Association with @almondscreations Written and Directed By : Digpal Lanjekar Produced By : @ajayarekarofficial #AniruddhaArekar

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial) on

अनेक ऐतिहासिक मूळ कागदपत्रे व ऐतिहासिक ग्रंथाच्या संशोधनातून हा चित्रपट साकारला जाणार आहे. या चित्रपटाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या तत्कालीन घराण्यांच्या वंशजाकडून अधिकृत कागदपत्रांची मदत झाली आहे.  अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

पावनखिंडीतल्या या रक्तरंजित संघर्षाला आता 350 हून अधिक वर्षे उलटून गेलीत. हा शिवकाळ पुन्हा जिवंत करणं अतिशय आव्हानात्मक होतं. त्यासाठी आवश्यक भव्य सेट्स, अतिशय अवघड साहसदृश्ये आणि तांत्रिक कौशल्य यांची मोट बांधणं जिकीरीचं होतं. हे शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टीमने नेहमीच्या अभ्यासू वृत्तीने आणि मेहनतीने उचलले आहे. आधीच्या सिनेमांच्या अद्भुत अनुभवामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर  यांच्यासह सुमारे 21 कलाकारांची भली मोठी मांदियाळी दिसणार आहे.

या चित्रपटासाठी तळेगाव दाभाडे येथील राजघराण्यातील सरदार सत्यशील राजे दाभाडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.