Pune News : वायव्य पुणे, पिंपरी चिंचवड भागात गृह खरेदीला पसंती, विक्री मूल्यात 27 टक्के वाढ

एमपीसी न्यूज – वायव्य पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात गृह खरेदीला ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. पुणे महानगर क्षेत्रात गृह खरेदीमध्ये 8 टक्के तर विक्री मूल्यात 27 टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या 38 व्या सर्वसाधारण सभेत सीआरई मॅट्रिक्स यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट’मध्ये ही माहिती समोर आली आहे.

पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रानुसार जानेवारी ते जुलै 2019 व 2021 दरम्यान विक्री झालेल्या घरांची संख्या, आकार आणि किंमतीवर अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. पुण्याचा वायव्य भाग म्हणजेच हिंजवडी, म्हाळुंगे, बाणेर, सूस, बालेवाडी सोबत ताथवडे, वाकड यासह पिंपरी चिंचवडच्या इतर भागात गृहखरेदीदारांची पसंती असल्याचे आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्र हळूहळू वाढीच्या मार्गावर असल्याचे देखील अहवालातून समोर आले आहे.

दरम्यान अनिल फरांदे म्हणाले, ‘या अहवालात आयजीआर महाराष्ट्राच्या वतीने देण्यात आलेल्या ख-या आकडेवारीचा समावेश करण्यात आला असल्याने यामधून आश्चर्य वाटावेत असे निष्कर्ष समोर आले आहेत. अहवालात नमूद 2019 व 2021 चे आराखडे हे आशावादी आहेत.’

सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता म्हणाले, ‘इंडेक्सटॅप व फ्लोअरटॅप या दोन प्लॅटफॉर्मद्वारे बांधकाम क्षेत्राशी आवश्यक व प्रमाणित माहितीचा वापर सदर अहवालामध्ये करण्यात आला आहे. पुणे हाऊसिंग रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीचा फायदा पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना होईल.’

अहवालातील ठळक मुद्दे

  •  पुणे महानगर क्षेत्रात 2019 च्या जानेवारी-जुलै महिन्यात 49 हजार तर 2021 च्या जानेवारी-जुलै महिन्यात 53 हजार घरांची विक्री झाली. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये या विक्रीत 8 टक्के इतकी वाढ झाल्याचे समोर आले.
  •  पुणे महानगर क्षेत्रात जानेवारी-जुलै 2019 मध्ये अंदाजे 21 हजार 500 कोटी तर जानेवारी-जुलै 2021 मध्ये 27 हजार 500 कोटी रुपये किंमतीच्या घरांची विक्री झाली. यामध्ये विक्रीमूल्यात तब्बल 27 टक्के इतकी वाढ दिसून आली. ही वाढ मोठ्या आकारांच्या घरांच्या खरेदीमुळे झाल्याचे सर्वेक्षणामध्ये दिसून आले.
  •  हिंजेवाडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस बालेवाडी या वायव्य पुण्याच्या भागात गृह खरेदीला ग्राहकांकडून पसंती मिळत असून जानेवारी- जुलै 2021 मध्ये या भागात तब्बल 7 हजार 160 कोटी रुपये किंमतीच्या घरांची विक्री झाली. शहराचा विचार केल्यास एकूण विक्रीच्या 26 टक्के इतकी विक्री ही एकट्या याच भागात झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. या खालोखाल पिंपरी चिंचवड भागात 23.5 टक्के इतकी विक्री झाल्याचे समोर आले आहे.
  •  पुणे महानगर क्षेत्रात एकूण घरांच्या विक्रीमध्ये वायव्य पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही भागांचे एकत्रितपणे तब्बल 50 टक्के इतके योगदान आहे. तर ईशान्य पुणे, नैऋत्य पुणे, आग्नेय पुणे व मध्य पुणे यांचे योगदान अनुक्रमे 19 टक्के, 15 टक्के, 14 टक्के आणि 3 टक्के इतके आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.