Bhosari : लाॅकडाऊनच्या काळात या ऍप च्या मदतीने घरातूनच मागवा किराणा, भाजीपाला व इतर साहित्य

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे व  नुकतीच त्याची मुदत तीन मे पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. बाहेर लागू असलेल्या संचारबंदी मुळे नागरिकांना किराणा, भाजीपाला, औषधे, बेकरीचे पदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी किराणा दुकानाबाहेर रांग लावावी लागते यावर उपाय म्हणून भोसरी मधील लॉजिक बिट्स सिस्टीम्स या कंपनीच्या महिलांनी ‘न्यु इंडिया शाॅप’ नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन व संकेतस्थळ तयार केले आहे या माध्यमातून घरबसल्या तुम्ही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करू शकता.

संचार बंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा मालाच्या दुकानावरती तसेच भाजीपाला खरेदीसाठी लोकांची झुंबड उडत आहे. कोरोना सारख्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग हा एक प्रभावी उपाय आहे. याच विचारातून लॉजिक बिट्स सिस्टीम कंपनीच्या संचालक गीतांजली भिसे यांना ‘न्यू इंडिया शाॅप’ या ॲप्लिकेशनची कल्पना सुचली. कंपनीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ‘सोशल डिस्टन्सिंग’ साठी परिणामकारक ठरणारे मोबाईल ॲप्लिकेशन व संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

न्यू इंडिया शाॅप हे ॲप्लिकेशन प्लेस्टोर वरती मोफत उपलब्ध आहे. मोबाईल वरती ऍप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहक व दुकानदार किंवा विक्रेते यांना या ॲप्लिकेशन वरती स्वतःला रजिस्टर करायचे आहे, त्यानंतर आपले क्षेत्र निवडून जवळच्या दुकानदाराला आपल्याला आवश्यक असलेल्या सामानाची यादी पाठवायची आहे. सामानाची यादी तयार केल्यानंतर दुकानदार तुम्हाला संपर्क साधून साहित्य घरपोच देईल किंवा तुम्ही स्वतः जाऊन साहित्य घेऊ शकता. या ॲप्लिकेशन वरती कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार होत नाहीत तसेच हे ॲप्लीकेशन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.  हे ऍप विविध १२ भाषेत उपलब्ध असून देशातील सर्व राज्यांत याचा वापर केला जाऊ शकतो

या ॲप्लिकेशनच्या निर्मितीसाठी कंपनीच्या संचालक गीतांजली भिसे यांच्यासहित सारिका अभंग, अनिता सातपुते, अस्मिता माने, अश्विनी क्षिरसागर व सुजाता सूर्यवंशी यांनी मेहनत घेतली आहे. या सर्व महिलांना संगणक विषयातील शैक्षणिक पार्श्वभूमी आहे.

कोरोना सारख्या आजारापासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे नागरिकांना या ॲप्लिकेशन व संकेतस्थळाची मदत होणार आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही सर्व प्रकारच्या जीवनावश्‍यक वस्तूंची घरबसल्या केव्हाही मागणी करू शकता व खरेदीसाठी कुठेही गर्दी करण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. – गीतांजली भिसे ( संचालक, लॉजिक बिट्स सिस्टीम प्रा. लि. )

ऍप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –

संकेतस्थळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.