New Indian App in market : आता बोलबाला ‘चिंगारी’चा…

New Indian App in market : Indian app 'Chingari' trending after ban on Tiktok app

एमपीसी न्यूज – चीनने लडाखमधील गलवान खो-यात आक्रमण केले. चिनी सैन्याला विरोध करणा-या वीस भारतीय जवानांना या चकमकीत शहीद व्हावे लागले. त्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली. त्यामुळे भारताने टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सना बंदी घातली आहे. टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर भारतीय अ‍ॅप ‘चिंगारी’ ट्रेंडींगवर आलं आहे. 50 लाखांहून जास्त युजर्सनी हे अ‍ॅप आतापर्यंत डाऊनलोड केलं आहे.

याआधी टिकटॉक या अ‍ॅपची बरीच चलती होती. पण त्याच्यावर बंदी आल्यावर भारतीय ‘चिंगारी’ने आता युजर्सना आकर्षित केले आहे.  सध्या ‘चिंगारी’ अ‍ॅपचे तासाला 1 लाखांहून अधिक डाऊनलोड्स  होत आहेत, तर आत्तापर्यंत एकूण 50 लाखाहून अधिक डाऊनलोड केलं गेलं आहे.

‘चिंगारी’ हे गुगल प्ले स्टोअरवर नोव्हेंबर 2018 ला Android युजर्ससाठी तर जानेवारी 2019 ला iOS साठी लॉंच झालं. हे अ‍ॅप बंगळूरुचे प्रोग्रामर्स बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी बनवलं आहे.  चिंगारी अ‍ॅपचे व्ह्यूज दर अर्ध्या तासाला 10 लाखानं वाढत आहेत. चिंगारी अ‍ॅप इंग्रजीसह नऊ भाषांमध्ये उपलब्ध आहे.  हिंदी, बांग्ला, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमिळ आणि तेलगूतही व्हिडीओ करणं यामुळे शक्य आहे.

मात्र सध्या टिकटॉक बॅन झाल्यामुळे चिंगारीवर खूप लोड आला आहे. यामुळे सर्व्हर क्रॅश होण्याची भीती चिंगारीचे सहसंपादक सुमीत घोष यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील व्यवस्था नीट लागेपर्यंत त्यांनी स्मार्टफोन युजर्सना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिलाय.

चिंगारी अ‍ॅप काहीसं टिक टॉक सारखंच असून यामध्ये व्हिडीओ अपलोड करण्यासोबतच चॅटिंग, नव्या लोकांशी बातचीत, व्हिडिओ, ऑडिओ, स्टिकर्स, GIF सोबत क्रिएटिव्हिटी केली जाऊ शकते. गुगल प्ले वर ट्रेंडींग टॉप अ‍ॅप्लिकेशनमध्ये या चिंगारीने स्थान मिळवलं आहे. चिंगारी अ‍ॅपला मिळणारा प्रतिसाद पाहता आता या अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा गुंतवणूकदार उत्सुक आहेत.

टिकटॉकला टक्कर देण्यासाठी सज्ज असलेल्या या चिंगारीने आता सोशल मिडियावर वणवा पेटण्याची चिन्हे आहेत. चिनी उत्पादनांवर बंदी टाकण्याचे एक चांगले पाऊल भारतीय युजर्सनी उचलले आहे. ते नक्कीच स्वागतार्ह आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.