Pimpri News : बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शहर उपजिविका केंद्र

एमपीसी न्यूज – महिला वर्गास प्रोत्साहन देणे, त्यांच्या बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच नागरिकांना विविध उपयुक्त सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या शहर उपजीविका केंद्राची संकल्पना राबविण्यात आली असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (दीनदयाल अंत्योदय योजना) अंतर्गत शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन पिंपरी येथील भाजी मंडई इमारतीमध्ये आज (मंगळवारी) करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास उपआयुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी अजय चारठाणकर, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी वंदना कवटे, शहर उपजिविका केंद्राचे व्यवस्थापक संजीव धुळम, ज्योती भोसले तसेच विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

महापौर ढोरे म्हणाल्या, शहरी उपजिविका केंद्राचा बचत गटांना वस्तू विक्री तसेच विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी उपयोग होणार आहे. महिलांनी तयार केलेल्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे त्यासाठी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. महिला विविध कलेत पारंगत असतात त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंकरीता चांगली बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे.

बचत गटांच्या माध्यमातून या योजनेचा उपयोग करावा असे सांगून गुणवत्ता ठेवून मालाची विक्री वाढवून महिलांनी स्वत:चा ब्रँड तयार करावा, वस्तू तयार करताना त्यामध्ये विविधता आणावी, मार्केटींग कसे करता येईल याचा अभ्यास करावा, त्याचे नियोजन करावे, सुरवातीला अपयश आले तरी खचून न जाता एकजूटीने काम करुन पुढे चालत रहा आणि आपले ध्येय निश्चित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या केंद्राच्या वतीने सेवा पुरवठादारांची नोंदणी करणे, रोजगार उपलब्ध करुन देणे, विमा विषयक सेवा पुरविणे, अभियाना अंतर्गत लाभार्थ्यांचे व इतर व्यक्तींचे कर्ज प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य करणे, बचत गटांच्या व्यवसाय व उत्पादनास सहाय्य करणे आदी सेवाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ज्योती भोसले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.