Pimpri : लक्झरी बसची टेम्पोला धडक; जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीकडून पुण्याच्या दिशेला जाणा-या लक्झरी बसने टेम्पोला मागून धडक दिली. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आयसीसी कंपनीसमोर झाला. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संत तुकाराम नगर येथे पिंपरी पुणे मार्गावर आयसीसी कंपनीसमोर दुचाकी जात होती. दुचाकीच्या मागून एक मालवाहतूक टेम्पो जात होता. मात्र, दुचाकी एकदम स्लीप झाली. त्यामुळे टेम्पोने ब्रेक लावला. दरम्यान, टेम्पोने अचानक ब्रेक लावल्याने पुण्याहून नांदेडला जाणारी पर्पल कंपनीची लक्झरी बस (एम एच 22 / 3840) पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून घसरली आणि समोर थांबलेल्या टेम्पोला धडकली. या अपघातात टेम्पो जुन्या महामार्गावर तर लक्झरी बस मेट्रो डीवाईडर आणि जुना महामार्गावर थांबली. यामुळे जुना महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

या अपघातात टेम्पोमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमी झालेल्या प्रवाशांनी लक्झरी बसवर दगड मारले. लक्झरी बस डिव्हायडरला धडकल्याने बसच्या काचा फुटल्या. या काचा बसमधील प्रवाशांना लागल्या. यामध्ये एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेली बस काढण्यात आली असून पोलिसांनी वाहतूक पूर्व पदावर आणली आहे.

लक्झरी बसच्या मागून एका मोपेड दुचाकीवरून तरुणी जात होती. हा अपघात तिच्या समोर झाला. आपल्या गाडीच्या समोर अपघात झाल्याने घाबरलेल्या तरुणीने चालू गाडीवरून उडी मारली. यामध्ये तरुणी देखील किरकोळ जखमी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.