Pune : व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून रचला दरोड्याचा डाव; एलसीबीने दोन दिवसांत गुन्हा उघड करत केला पावणेचार कोटींचा ऐवज जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

एमपीसी न्यूज – दौंड येथे सराफी दुकानदाराचे व्हॉट्स अप स्टेट्स बघून त्याला लुटण्याचा डाव रचला. त्याप्रमाणे त्याला लुटले देखील, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शिताफीने तपास करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. चार दरोडेखोरांकडून 9 किलो 600 ग्रॅम वजनाचे 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची ही मोठी कारवाई आहे.

गणेश दगडू पवार (वय 27), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (वय 23, रा. महुत, नागणखोरा, ता. सांगोला, जि. सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलानी (वय 25), प्रथमेश विजय भांबुरे (वय 26, रा. दिघंची, कटफळ  गल्ली, ता. आटपाडी, जि. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आप्पा श्रीराम कदम (रा.कौठळी, आटपाडी, जि. सांगली) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आप्पा यांना व्हॉट्स अपवर स्टेटस ठेवण्याची सवय आहे. सवयीप्रमाणे त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी आप्पा यांनी ‘गुड बाय कौठळी’ असे स्टेटस ठेवले. आरोपी आप्पा यांच्या स्टेटसवर लक्ष ठेवून होते. आप्पांचे स्टेटस अपडेट होताच आरोपींनी त्यांना लुटण्याचा कट रचला. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास आप्पा आणि त्यांचे जोडीदार हे दोघेजण कलकत्ता ते मुंबई या रेल्वेतून दौंड रेल्वे स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले असता आरोपींनी त्यांना गाठले. आप्पा आणि त्यांच्या साथीदाराला प्रवासी म्हणून कारमध्ये बसवून त्यांना कुरकुंभ, भिगवण मार्गे बांगरवाडी गावाच्या हद्दीत नेले.

प्रवासादरम्यान आरोपींनी आप्पांना हाताने मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल फोन काढून फेकून दिले. पाकीट, सोन्याची बिस्किटे आणि रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दौंड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींची ओळख पटवली. तसेच आरोपींना बेड्या ठोकल्या.

आरोपींकडून एम एच 14 / डी ए 6444 ही कार ताब्यात घेतली. त्यामध्ये तब्बल 9 किलो 500 ग्रॅम वजनाचे सोन्याची 29 बिस्किटे, सोन्याच्या तीन मोठ्या पट्ट्या, चार मोबाईल फोन, एक एअरगन असा एकूण 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नियोजनबद्ध केलेला हा गुन्हा उघकीस आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा गुन्हा शिताफीने दोन दिवसांमध्ये उघकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या पथकाला 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक फौजदार दयानंद लिमण, पोलीस कर्मचारी महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, मुकुंद अयाचित, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, प्रवीण मोरे, नितीन भोर, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.