Pimpri : महापौर चषक टीन ट्‌वेन्टी रविवारपासून; 19 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

उपमहापौर तुषार हिंगे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणा-या महापौर चषक आंतरशालेय टीन ट्‌वेन्टी क्रीडा स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे 20 दिवस चालणा-या स्पर्धेत 19 हजार 86 विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत विजेते, उपविजेते संघ, खेळाडूंना रोख बक्षिसे, ट्रॉफी, मेडल्स, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी आज (गुरुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रफुल्ल पुराणिक, कुशल पुरंदरे उपस्थित होते. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ  रविवारी (दि.12) दुपारी चार वाजता भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल येथे होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

तुषार हिंगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘फिट इंडिया’ची संकल्पना लक्षात घेऊन मुलांनी मैदानावर येऊन खेळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुले, पालक आणि शिक्षकांमध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची जाणीव व्हावी हा ‘फिट इंडिया’ उपक्रमाचा हेतू आहे. त्यामुळे  यावर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी महापौर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  20 क्रीडा प्रकारांमध्ये शालेय महापौर चषक टीन 20 क्रीडा स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेमध्ये मैदानी खेळ, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटिंग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, बास्केटबॉल, हॅन्डबॉल आणि कराटे अशा 20 प्रकारांत विद्यार्थी खेळाडू मैदानात उतरणार आहेत. महापालिकेच्या 23 ठिकाणच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. महापालिका शाळेतील सहा ते सात हजार आणि खासगी शाळेतील 13 हजार असे सुमारे 19 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.  महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी स्पर्धेत चांगली कामगिरी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अंतिम स्पर्धा बालेवाडीतील क्रीडा संकुलात होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे मैदान कसे असते.  त्या मैदानावर स्पर्धा कशा होतात हे विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी बालेवाडीला अंतिम स्पर्धा ठेवल्या आहेत.  महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची जाणे-येण्याची सोय महापालिका करणार आहे. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची-त्यांना सोय करावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.