Pimpri : मुख्य लेखा अधिका-याच्या दिमतीला मिळणार नवी मोटार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या दिमतीला असलेले वाहन वारंवार नादुरूस्त होत आहे. तर, दुस-या मोटारीची धाव मर्यादेपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे मुख्य लेखा अधिका-यांसाठी नवीन मोटार घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली.

लेखा विभागाचे प्रमुख जितेंद्र कोळंबे यांनी वाहन सुविधेची मागणी केल्यावर त्यांना प्रशासन विभागाकडील वाहन तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. हे वाहन काही कालावधी व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर वारंवार नादुरूस्त होणे, चालू वाहनातून मध्येच धूर येणे आदी तक्रारी येऊ लागल्या.

वाहन दुरूस्ती कार्यशाळेकडे ते दुरूस्तीसाठी पाठविल्यानंतर त्यांनी दुसरी मोटार उपलब्ध करून दिली. त्याची धाव 2 लाख 37 हजार 887  किलोमीटर म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त झाली असल्याने आधीच्या मोटारीपेक्षा या मोटारीची स्थिती अधिक वाईट झाली. परिणामी, पुन्हा जुनेच वाहन लेखा अधिका-यांच्या दिमतीला देण्यात आले. या वाहनाची दुरूस्तीची तक्रार, अधिक अंतरासाठी चालेल की नाही याची खात्री नाही, तसेच मध्येच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य लेखा अधिका-यांसाठी नवीन वाहन देण्याची गरज असल्याचे कार्यशाळेने सांगितले.

त्यावर महापालिका विद्यूत व यांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी नवी मोटार खरेदीस हरकत नसल्याचा अभिप्राय दिला. 6  लाखांच्या मर्यादेत राहून खातेप्रमुखांनी आपल्या खात्याला आवश्यक वाहने खरेदी करावीत, असे शासन निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार त्या किमतीच्या मर्यादेत राहून नवीन मोटार खरेदी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.