New Movie of Pravin Tarde : जाणून घेऊया ‘आता परीक्षा देवाची’ म्हणजे नक्की काय?

Let's find out what exactly is 'Aata Pariksha Devachi'? लवकरच ‘देऊळ बंद 2 ..आता परीक्षा देवाची’, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एमपीसी न्यूज – झगमगत्या चित्रपटसृष्टीत काही अभिनेते असे आहेत की ज्यांनी अजूनही आपले संस्कार जपले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे.  त्यांचा  २०१५ साली प्रदर्शित झालेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट अक्कलकोटचे ‘श्री स्वामी समर्थ’ महाराज यांच्या भक्तीवर आधारित होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर ‘देऊळ बंद’चा सिक्वल यावा अशी अनेकांनी मागणी केली होती. विशेष म्हणजे पाच वर्षानंतर प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद’च्या सिक्वलची घोषणा केली असून लवकरच ‘देऊळ बंद 2 ..आता परीक्षा देवाची’, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रवीण तरडे यांनी ५ जुलै रोजी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या आगामी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची घोषणा केली. यावेळी चित्रपटाचे निर्मातेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे रविवारी (४ जुलै) गुरुपौर्णिमा असल्याच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी अन्य कोणताही चांगला दिवस नसल्याचं म्हणत त्यांनी ही घोषणा केली आहे.

‘आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ‘देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची’ या नव्या चित्रपटाला सुरुवात करतोय आणि पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल’, असं चित्रपटाच्या निर्मात्या जुईली वाणी- परदेशी यांनी सांगितलं. तसंच ‘गेल्यावेळी स्वामींना शास्त्रज्ञ भेटले होते…यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे.  हा सिनेमाही हिट होईल’, असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे करत असून निर्मिती जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट पुढच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच २३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्यापतरी या चित्रपटातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.