Bhosari : ‘त्या’ मुलींवर नराधम बापानेच केले अत्याचार?

तीन मुलांना मारून आईची आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

एमपीसी न्यूज – पोटच्या तीन मुलांना गळफास लावला. त्यानंतर आईने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला वेगळे वळण लागले आहे. गळफास दिलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोसरी पोलिसांनी नराधम बापाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये 28 वर्षीय आई, 9 आणि 7 वर्षीय दोन मुली तसेच 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चारच्या सुमारास भोसरी मधील नुरमुहल्ला येथे तीन मुलांसह आईने गळफास घेतल्याची घटना समोर आली. नियंत्रण कक्षाकडून भोसरी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता समोरच्या खोलीत चिमुरड्या दोन मुली आणि एक मुलगा तिघांना गळफास लावण्यात आला होता. तर आतल्या खोलीत त्यांच्या आईने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला होता.

पोलिसांनी चौघांचे मृतदेह पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर चिमुरड्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तपास करत संशयित म्हणून बापाला ताब्यात घेतले आहे.

मृतदेह ताब्यात घेत असताना पोलिसांना चिमुरड्या मुलींच्या कपड्यांवर रक्त पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यांनी संपूर्ण घर पिंजून काढले. त्यावेळी एक संशयास्पद कापड पोलिसांना मिळाले आहे. मिळालेले कापड मुलींच्या वडिलांचे आहे. त्यामुळे या घटनेशी बापाचा काही संबंध आहे का? याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा बापावर संशय आहे. या प्रकरणात डीएनए चाचणीसाठी अहवाल पाठवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.