Chakan : तीन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, गाडी अंगावर घालणाऱ्या साथीदारांना पकडण्याच्या प्रयत्नात उपअधीक्षक जखमी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व चाकणपासून विभक्त करण्यात आलेल्या महाळुंगे पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी भानुदास जाधव यांच्यासह एक पोलीस नाईक आणि त्याचा खाजगी सहायक (झिरो पोलीस) यांना शनिवारी (दि.२८) सायंकाळी पाचच्या सुमारास तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा लावला असल्याची कुणकुण लागताच पैसे आणि वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पळून जाणाऱ्या वाहनाला पोलीस उपाधीक्षक श्रीहरी पाटील अक्षरशः लटकले. काही अंतर फरपटत गेल्याने ते जखमी झाल्याचा थरार  खराबवाडी ( ता. खेड) येथे घडला.

चाकण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून एक पोलीस नाईक आणि पोलिसांचा खाजगी सहाय्यक रात्री उशिरापर्यंत फरारी होते. तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यात निर्दोष सुटण्यासाठी मदत करण्यासाठी १० लाखांची मागणी पोलीस निरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे केली होती. मात्र, त्यात सात लाखांची तडजोड रक्कम ठरली. ठरलेल्या रकमेपैकी तीन लाख रुपये घेऊन पोलीस निरीक्षक जाधव याने महाळुंगे येथे शनिवारी बोलावून घेतले.

दरम्यान, यातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक जाधव यांनी ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी पोलीस नाईक अजय भापकर आणि एका खाजगी सहाय्यकास सांगितले. पोलीस निरीक्षक जाधव याच्या आदेशानंतर तक्रारदार आणि पोलीस नाईक भापकर खराबवाडी येथे गेले. त्यांच्या मागावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक होते. भापकर याने लाचेची रक्कम खाजगी सहाय्यक असलेल्या पाटील नामक व्यक्तीच्या स्कॉर्पिओ एम एच १४ सी ए ९४४४ मध्ये देण्यास सांगितली. रक्कम या वाहनात देताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदरच्या वाहनाकडे धाव घेतली. मात्र, पाटील नामक इसमाने वेगात पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपाधीक्षक श्रीहरी पाटील अक्षरशः लटकले. काही अंतर फरपटत गेल्याने ते जखमी झाले. त्यानंतर वाहन चालक पाटील याने पोबारा केला. पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यास ताब्यात घेण्यात आले असून, वाहन आणि त्यातील लाचेची ३ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

दरम्यान, महाळुंगे परिसरात मागील काही दिवसात नवीन चौकी झाल्यानंतर भानुदार जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान येथील नागरिकांना आणि उद्योजकांना पैशांसाठी त्रस्त केले जात होते. अवैध धंदेही बोकाळले होते. त्या अवैध धंद्यांमध्ये काही पोलिसांचीच भागीदारी असल्याची चर्चा होती. गुन्हे शाखेच्या माध्यमातूनही काहींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हजेरी लावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.