Pimpri : हितेश मुलचंदानी खून प्रकरणी अल्पवयीनासह आणखी एका आरोपीला अटक

खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – हितेश मुलचंदानी खून प्रकरणी आणखी एका आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने दापोडी येथून अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. 
अरबाज मुन्ना शेख (वय 20, रा. खडकी बाजार पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय 25, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय 20, रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव), आमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे) यांना यापूर्वी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील आरोपी अरबाज शेख दापोडी येथील आत्तार वीट भट्टी जवळ थांबला असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तो हितेश मुलचंदानी खून प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न होताच त्याला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हितेशच्या मित्रांचे पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिला वरून वाद झाले. किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेशला त्याच्या मित्रांचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत कुणाल हॉटेल गाठले.  हॉटेलमध्ये भांडणे सोडवत असताना चार जणांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले. चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी घटनेच्या दिवशी एकाला ताब्यात घेतले. त्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने औंध येथे आणखी दोघांना अटक केली. त्यानंतर खंडणी दरोडा विरोधी पथकाने चौथ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
 ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, महेश खांडे, किरण काटकर, उमेश पुलगम, नितीन लोखंडे व सागर शेळके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.