Pimpri : मेट्रोचे संपूर्ण एक युनिट पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल; कामगार नगरीत मेट्रोचे जंगी स्वागत

एमपीसी न्यूज – महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन)चे संपूर्ण एक युनिट पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या पहिल्या तीन डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तीन डब्यांची एक मेट्रो असणार असून पहिल्या एक मेट्रोचे तीन कोच शहरात दाखल झाले आहेत.

पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतिपथावर आहे. जून 2017 मध्ये महा मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर, मेट्रोसाठी नागपूर येथून कोच आणण्यात आले आहेत.

मेट्रोचा एक संच नागपूरहून रविवारी (दि. 22) पुण्याकडे रवाना झाला होता. तब्बल आठ दिवसांच्या प्रवासानंतर हे कोच आज, रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. पुण्यात कोच डेपोचे काम अद्याप झाले नाही. त्यामुळे कोचमध्ये विविध उपकरणांची फिटिंग आणि चाचण्या करण्यासाठी पुणे मेट्रोला नागपूरवर अवलंबून राहावे लागत आहे. सुरुवातीला आणलेला एक संच नागपूर येथील कोच डेपोमध्ये प्राथमिक चाचण्या, फिटिंगची कामे आणि रंगसंगती व सजावट करून पुण्याकडे रवाना करण्यात आला आहे .

प्रत्येक संचामध्ये तीन डबे आहेत. त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव आहे. एका मेट्रो ट्रेनमध्ये 950 ते 970 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. मेट्रो ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. मेट्रोचे तीनही डबे एकमेकांना जोडलेले असणार आहेत. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाऊ शकतील. स्टेनलेस स्टीलपासून बनविलेले डबे वजनाला हलके आहेत. अत्याधुनिक एलईडी दिवे, बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार आतील दिवे आपोआप कमी-अधिक प्रकाशमान होण्याची यंत्रणा यात वापरण्यात आली आहे. मेट्रो अधिकतम 90 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावणार आहे. मेट्रोमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग सुविधा, प्रवाशांसाठी दृक्-श्राव्य सूचनाप्रणाली असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.