Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले खासदार श्रीरंग बारणे यांचे कौतुक

एमपीसी न्यूज – पवार परिवाराचा पहिला पराभव केल्याबद्दल मावळ लोकसभा मतदारसंघाचे  खासदार श्रीरंग बारणे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला. पवार परिवारातील पहिला पराभव मोठ्या मताधिक्याने केल्याबद्दल आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले.

लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अनेक राजकीय विश्लेषक व माध्यमांचे प्रतिनिधी वेगवेगळा अंदाज बांधत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मावळ लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून होते. अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवत असल्यासारखे मावळ मतदारसंघात प्रचार करीत होते. संपूर्ण पवार कुटुंबीय प्रचारात सक्रिय होते.

शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघात तीन सभा घेतल्या. या परिवाराने कधी नव्हती एवढी ताकत सर्व बाजूंनी लावली. पुणे, बारामती तसेच राज्याच्या अनेक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते. असे सर्व असतानाही खासदार श्रीरंग बारणे यांनी शांत, संयमाने ही निवडणूक हाताळली. एकूणच बारणे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे, त्याचबरोबर लोकसभेतील त्यांचे उल्लेखनीय काम या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा जवळपास सव्वा दोन लाख मतांनी पराभव केला.

बारणे यांच्या या विजयाने त्यांची राजकीय लोकप्रियता अधिकच वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या वर्धा येथील पहिल्या जाहीर सभेत मावळ लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला. पवार परिवाराचा पराभव करण्याचे आवाहन देखील या सभेत त्यांनी केले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पंतप्रधान कार्यालयात बोलावून बारणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.