Chinchwad : ‘आशा भोसले’ पुरस्कार मिळणे म्हणजे स्वप्ना पलीकडचा क्षण- अवधूत गुप्ते

अवधुत गुप्ते यांना 'आशा भोसले' पुरस्कार प्रदान, पुरस्काराची रक्कम दिली पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज – आयुष्यातील पहिलाच जाहीर पुरस्कार मिळाला आहे. ज्यांच्या आवाजाची पूजा केली. त्या आशा भोसले यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे याहून मोठे काहीच असू शकत नाही. आजपर्यंत थांबलो. त्याचे मोठे फळ मिळाले आहे. स्वप्नातही ‘आशा भोसले’ पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. स्वप्ना पलीकडचा हा क्षण आहे, अशी भावना प्रसिद्ध पार्श्‍वगायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली. दरम्यान, गुप्ते यांनी पुरस्काराची एक लाख 11 हजार रुपये रक्कम पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ग्रुपकडे सुपूर्द केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास देण्यात येणा-या यंदाच्या ‘आशा भोसले पुरस्कारा’ने गुप्ते यांना आज (शनिवारी) सन्मानित करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख 11 हजार रुपये रोख, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे अध्यक्ष सचिन ईटकर, नाट्य परिषदेच्या शिरुर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, कोथरुड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, कृष्णकुमार गोयल, राजेशकुमार सांकला, अवधूत यांच्या मातोश्री गंगा गुप्ते, बहीण आरती वैष्णव उपस्थित होते.

गुप्ते म्हणाले, आयुष्यातील हा पहिलाच पुरस्कार आहे. 18 वर्षांच्या मेहनतीचे हे फळ मिळाले आहे. आज भावनांचा गोंधळ उडाला आहे. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचे प्रत्येक गीत ऐकले असून त्यामध्ये आजपर्यंत कधीच बेसूर आढळला नाही. त्यांनी माझी पुरस्कारासाठी निवड केल्याने मी भरून पावलो आहे. ते द्रोणाचार्य असून मी एकलव्य आहे. उत्कृष्ट, चोख, अचूक तालातील महाराष्ट्रातील जनतेला देण्याची इच्छा आहे. गाणे, संगीत पेटी, वाद्यत नसून सुरांच्या अवती-भवती असते.

नवीन पिढीने स्पंज होऊन स्वतःला शोधावे. बाहेरची संस्कृती शिकावी. त्यानंतर मराठी भाषा काय आहे हे समजेल. त्यावर तुम्ही प्रेम कराल, असेही गुप्ते म्हणाले.

गिरीश प्रभुणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक वारसा लुप्त होता. पण भाऊसाहेब भोईर यांनी त्या वारसाचे संवर्धन केले आहे. त्यांनी सांस्कृतिक वारसाचा झेंडा हाती घेतला आहे. शहराचे रूप कामगारनगरी न राहता त्याला सांस्कृतिक गाभा लागला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, मोरया, चापेकर यांच्या भूमीत सांस्कृतिक ठेवा जपला आहे.

ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, पुरस्काराकडे व्यवसाय म्हणून भाऊसाहेब यांनी पाहिले नाही. कोणाचेही स्पॉन्सरशीप न घेता सलग 18 वर्ष पुरस्कार सुरू ठेवला आहे. या मंचावरून पुरस्कार मिळणारा माणूस भाग्यवान आहे. अवधूत गुप्ते उत्कृष्ट गायक, संगीतकार, नर्तक आहे. अवधूत या नावात गूढ आहे.

प्रस्ताविकात भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘आशा भोसले’ हा पुरस्कार मोरया गोसावी यांचा प्रसाद आहे असे समजावे. लतादीदी आणि आशा भोसले संगीत क्षेत्राच्या श्वास आणि उच्छवास आहेत. तर, गुप्ते यांनी ह्रदय बनावे. गुप्ते हे जमिनीवरील माणूस आहेत. सर्वात तरुण कलाकाराला हा पुरस्कार देण्यात येत असल्याने आनंद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.