New serial on Ganpati Bappa – ‘देवा श्री गणेशा’ ही विशेष मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गणेशोत्सवाच्या 11 दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे.

0

एमपीसी न्यूज – यंदा करोनाच्या संकटामुळे सण समारंभ साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. बाकीच्या समारंभांचे ठीक असले तरी गणरायांचे स्वागत दणक्यात व्हायला हवे असे प्रत्येकाचे मागणे असते. मात्र ते देखील यंदा शक्य होणार नाही. पण भक्तांच्यासाठी काही चॅनेल विशेष मालिकांचे प्रक्षेपण करणार आहे.

खास गणेशोत्सवासाठी स्टार प्रवाह वाहिनीवर गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. वाहिनी गणेशोत्सवाच्या 11 दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे.

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपण कधीही ऐकल्या आणि पाहिल्या नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे.

अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकीवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा? बाप्पा भालचंद्र कसा झाला? याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहित नाही. ‘देवा श्री गणेशा’ या 11 भागांच्या विशेष मालिकेतून गणपतीच्या अकरा कथा ज्या ऐकलेल्या आहेत मात्र त्याविषयी फारशी माहिती नाही, अशा बाप्पाच्या पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या 11 दिवसांत विशेष काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे स्टार प्रवाह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भव्य रुपाचं दर्शन घरोघरी घडवून आणणार आहे. बाप्पाच्या गोष्टींमध्ये लपलेले आणि माहित नसलेले पैलू या विशेष मालिकेद्वारे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतील. या भव्य मालिकेतून संस्कार घडवणाऱ्या छान गोष्टी भव्य स्वरुपात पहायला मिळणार आहेत. बाप्पाच्या या गोष्टी पहाताना मन गर्व आणि आनंदाने नक्कीच भरुन येईल अशी खात्री आहे.’

महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ तिवारी यांच्या स्वस्तिक प्रॉडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. उमरगाम इथे या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like