New Symptoms of Corona : कोरोनाची आणखी तीन नवी लक्षणे समोर, जाणून घ्या… कोणती?

New Symptoms of Corona: Three more new symptoms of corona, find out ... which ones? वास घेण्याची संवेदना नाहीशी होणे व तोंडाची चव जाणे या नवीन कोरोना संबंधित लक्षणांच्या समावेशानंतर अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने आणखी तीन लक्षणांचा समावेश केला आहे.

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने वास घेण्याची संवेदना नाहीशी होणे व तोंडाची चव जाणे या नवीन कोरोना संबंधित लक्षणात समावेश केला होता. आता या यादीत अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने आणखी तीन लक्षणांचा समावेश केला आहे.

कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत जात असताना त्यासंबधीत नवीन लक्षणांची वाढ होत आहे. सुरवातीला ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणांचा यामध्ये नव्याने समावेश केला आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या मेडिकल संस्थेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, नाक वाहणे, मळमळ होणे आणि  अतिसार ही तीन नवीन लक्षणे देखील कोरोनाची लागण झाल्याचे संकेत देतात असे सांगितले आहे.

सतत वाहणारे नाक 

जर एखाद्या व्यक्तीचं नाक सातत्याने वाहत असेल तसेच त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल तर, अशा व्यक्तीने कोरोनाची चाचणी करायला हवी. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता असू शकते असे CDC ने सांगितले आहे.

मळमळ होणे

CDC च्या मते, जर एखाद्या व्यक्तीला वारंवार मळमळ होत असेल किंवा उलटीसारखं वाटत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. अशा व्यक्तीने तातडीने स्वत: विलग करावं. मात्र मळमळ होण्याची इतर कारणंही असू शकतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष  न करता सातत्याने असं होत असेल तर, कोरोनाची चाचणी करावी.

अतिसार

कोरोना तिसरं नवं लक्षण म्हणजे अतिसार. डॉक्टरांनी याआधीही मान्य केलं होतं की कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अतिसारासारखे मिळतेजुळते लक्षणे असतात. आता CDC नेही मान्य केलं आहे की, जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे आढळून आली आहेत.

कोरोनाची एकूण 11 लक्षणे 

ताप व थंडी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, चव न कळणे, घसादुखी किंवा खवखव आणि आता नाक वाहणे, मळमळ होणे आणि  अतिसार ही तीन नवीन लक्षणे समोर आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.