BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गणेशोत्सवातील देखावे यंदा रात्री 12 वाजेपर्यंत पाहता येणार

नगरसेवक रासने यांनी याविषयी पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती

एमपीसी न्यूज – गेली अनेक वर्षे पुण्यामध्ये उत्तम सुरु असलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यांना रात्री १० वाजेपर्यंत मर्यादा आहे. त्यामुळे आता यंदा सलग सात दिवस रात्री १२ पर्यंत देखावे पाहण्यासाठी परवानगी मिळावी. तसेच विसर्जन मिरवणूक थाटात व्हावी. याकरिता संपूर्ण मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना संपूर्ण वेळ परवानगी मिळावी. यामुळे मिरवणूक ही अखंडपणे सवाद्य सुरू राहील, अशी मागणी नगरसेवक व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख यांनी नुकत्याच गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे पारितोषिक वितरण समारंभात केली होती. 

यावेळी पालकमंत्री चंद्रकात पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. या मागणी विषयी चंद्रकात पाटील यांनी कायदेविषयक चर्चा सुरु असून मंडळांना समाधान वाटेल, असा मार्ग आपण काढू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे दिनांक ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान सलग ६ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात सांगितले. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

हेमंत रासने म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात आम्ही गणेश मंडळांचे कार्यकर्ते म्हणून केलेल्या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आम्हाला आनंद आहे. यापूर्वी रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरु ठेवण्याची परवानगी केवळ चार दिवस होती. ती वाढवून मिळावी, अशी मागणी आम्ही केल्यानंतर त्या मागणीला कार्यक्रमात खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांसह इतर अनेक मान्यवरांनी दुजोरा दिला होता. ही मागणी पालकमंत्र्यांनी मान्य केल्याने आम्हा गणेशोत्सव कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.