Pimpri : पंतप्रधान आवासच्या साडेतीन हजार सदनिकांसाठी महापालिका ऑनलाईन अर्ज मागविणार

अर्जासमवेत पाच हजारांचा डिमांड ड्राफ्ट जोडणे बंधनकारक; देशात कोठेही नावावर घर, तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे

महासभेतील आयत्यावेळचा विषय तहकूब

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यातील तीन हजार 664 सदनिकांसाठी नव्याने ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत.  अर्जासमवेत पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडणे बंधनकारक आहे. देशात कोठेही नावावर घर आणि तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलेले पिंपरी-चिंचवड शहारातील कोणत्याही भागातील नागरिक अर्ज करु शकतात. त्यानंतर लॉटरी पद्धतीने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासाठी 24 ते 36 महिन्याचा कालावधी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर आयत्यावेळी दाखल केला. परंतु, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव तहकूब केला आहे. दरम्यान, यापूर्वी केलेला डिमांड सर्वे  कोणत्या घरांची मागणी होती, यासाठी करण्यात आल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पंतप्रधान आवास योजना : सर्वांसाठी घरे – 2022  या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पिंपरी – चिंचवड महापालिकेला 72  हजार 326 घरकुलांचे उद्दीष्ट दिले आहे. 2017-18 मध्ये 7 हजार 233, 2018-19  मध्ये 14  हजार 465, 2019-20  मध्ये 14 हजार 465, 2020- 21 मध्ये 14  हजार 465 आणि 2021 -22  मध्ये 21 हजार 698 घरकूल उभारण्याचा संकल्प आहे. तथापी, भागीदारीद्वारे परवडणा-या घरांची निर्मिती करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले असून च-होली ( सदनिका 1442, बांधकाम किंमत 9 लाख 19 हजार), रावेत ( सदनिका 934, बांधकाम किंमत 9 लाख 45 हजार), बो-हाडेवाडी (सदनिका 1288, बांधकाम किंमत 8 लाख 71 हजार), आकुर्डी (568), आणि पिंपरी – वाघेरे (370) या ‘ठिकाणी 30 चौरस मीटर (323 चौरस फुट) चटई क्षेत्रापर्यंतची घरकुले बांधण्याचे नियोजन आहे. उर्वरित या पाचही गृहप्रकल्पांचे काम सध्या वेगाने सुरु आहे.

त्यातील च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणच्या गृहप्रकल्पातील  तीन हजार 664 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. देशात कोठेही नावावर घर आणि तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलेले नागरिकांना या सदनिका दिल्या जाणार आहेत. या अंतर्गत केंद्र सरकारकडून दीड लाख आणि राज्य सरकारकडून एक लाख रुपये प्रति घरकुल अनुदान मिळणार आहे. उर्वरित 6 लाख 69 हजार रुपयांचा हिस्सा लाभार्थ्यांना तीन टप्प्यात भरायचा आहे. तर,  आकुर्डी (568), आणि पिंपरी – वाघेरे (370) येथील सदनिकांमध्ये रस्ता, आरक्षणाने बाधित झालेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पिंपरी – चिंचवड महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ‘डिमांड सर्व्हे’ केला होता. त्यात 84 हजार 275 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते. तर, महापालिकेने नेमलेल्या ‘क्रॅनबेरी एनएक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ‘केदाराकडे संपूर्ण माहितीसह 37 हजार 306 अर्ज मिळाले. तर, 23  हजार 684 अर्ज माहिती अपुरी असल्या कारणास्तव प्रलंबित आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारात 1 लाख 34 हजार 395  नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील सुमारे पाच हजार डुप्लिकेट अर्ज बाद करण्यात आले आहेत.

आता च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणच्या गृहप्रकल्पांसाठी महापालिका नव्याने ऑनलाईन अर्ज मागविणार आहे. नागरिकाने ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर अर्जासमवेत आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, बँक पासबुक, वीजबील, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडणे बंधनकारक आहे. याखेरिज 5 हजार रुपयांचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) जोडणेही सक्तीचे आहे. या प्रक्रियेचा कालावधी 30 दिवसांचा आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. लॉटरी पद्धतीने सोडत काढून प्रकल्पाकरिताचे लाभार्थी निश्चित करण्यात येतील. इच्छुक लाभार्थी तीनही प्रकल्पाकरिता स्वतंत्र अर्ज करण्यास मूभा असून मात्र प्रत्येक अर्जासमवेत पाच हजार रुपये भरावे लागणार आहेत.

या तीनही गृहप्रकल्पांमध्ये अनुसूचित जातीसाठी 11 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 6 टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी 3 टक्के आणि दिव्यांगांसाठी 2 टक्के आरक्षण आहे. सदनिकांची किंमत निश्चित झाली असून घरकुलांची सोडत झाल्यावर अर्जदारास 40  टक्के रक्कम भरावी लागेल. गृहप्रकल्पाचे काम 50 टक्के झाल्यावर अर्जदारास सदनिकेची उर्वरित 40 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तर, गृहप्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर उर्वरित वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.