Pune : इव्हीएम बाबत संशय असला तरी ठोस पुरावा नाही – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – ईव्हीएम बाबत संशय असला तरी त्याचा ठोस पुरावा नाही. त्यावर चर्चा न करता विधानसभेसाठी आता बुथनिहाय नियोजन, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांतील समन्वयातून पक्षसंघटन करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी येथे केले. लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा शोध आणि बोध घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांनी आज तालुक्याचा दौरा केला. यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

तळेगाव स्टेशन येथील रिक्रिएशन हॉलमध्ये आयोजित बैठकीस पक्षाचे शहराध्यक्ष गणेश काकडे, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, कैलास गायकवाड, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आशिष खांडगे, तळेगाव शहर महिलाध्यक्षा सुनिता काळोखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पार्थ पवार पुढे म्हणाले, की मी पराभवाने खचून गेलो नाही. लोकसभेसाठी चांगले काम केलेल्या कार्यकर्त्यांनीही आता धीर धरावा. पुलवामा प्रकरण आणि पवार कुटुंबीयांविषयी अफवांची बीजे भाजपा आणि आरएसएसने पेरली. प्रशांत किशोरच्या टीमने मावळात बेमालूमपणे अशी रणनिती राबविली. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला काहीच करावे लागले नाही. त्यावर चर्चा न करता आता आपण खरेच कमी पडलो का आणि त्यासाठी काय बदल करायचे यासाठी संवादाची गरज आहे. विधानसभेसाठी पुन्हा जोमाने काम करण्याचे आवाहन पार्थ पवार यांनी केले.

बबनराव भेगडे यांनी दौ-याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले, की कोणी मंत्री झाला म्हणून विजयी होईल हा समज मनातून काढून टाका. पराभवाने खचून गेलेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी पार्थ पवार यांनी बुथ कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत केलेल्या कामाची पावती घ्यायची असेल तर सर्वजातीधर्माच्या कार्यकर्त्यांचे आणि महिलांचे संघटन आणि मतदारांशी संपर्कावर भर दिला पाहिजे.

पक्षाचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीतील राजकीय परिस्थिती व संघर्षाचा संदर्भ देत ते म्हणाले, की विस्कटलेले पक्षसंघटन लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांच्या उमेदवारीमुळे एकत्रित झाले. आता परिस्थिती सुधारत आहे. पक्षश्रेठींचा निर्णय अंतिम मानून
नगरपरिषदेची निवडणूक लढवली. प्रभागात चांगले काम आणि संपर्क असतानाही पराभवास सामोरे जावे लागले. नगरपरिषदेच्या निवडणुकांत ज्येष्ठ नेत्यांच्या तत्कालीन भूमिकेवर काकडे यांनी कोरडे ओढत रोखठोक मत मांडले.

पक्षनिष्ठा महत्वाची आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराचे निष्ठावंत म्हणून काम करण्याचा आणि निवडून आणण्याचा
निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून गणेश काकडे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या  संख्येने उपस्थित होते. शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंन्द्र किल्लावाला, तुषार भेगडे, राजेश बारणे, नगरसेवक अरूण माने, बापू कदम आणि निरंजन जहागीरदार या बूथ कमिटी प्रमुखांनी त्यांची मनोगते व्यक्त केली.

यावेळी पार्थ पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना पदाधिकारी यांना निवडीची पत्रे देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र  दाभाडे, महेश फलके, शंकर भेगडे, माजी उपनगराध्य नंदकुमार कोतुळकर, माजी नगरसेवक आयुब सिकिलकर, शहानूर मुलानी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदकुमार कोतूळकर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.