BNR-HDR-TOP-Mobile

Pune : घरफोडी प्रकरणातील तीन चोरट्यांना 24 तासात अटक

समर्थ पोलिसांची कामगिरी

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुण्यातील नानापेठेतील राजेवाडी येथील किराणा व्यापा-याचे घर फोडणा-या तीन चोरट्यांना समर्थ पोलिसांनी 24 तासात अटक केली. ही घटना 4 जून ते 9 ऑगस्ट या दरम्यान घडली. एका अल्पवयीनासह दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.

रोहन सचिन घाडगे (वय 19), उमरान करीम शेख (वय 19), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मानाराम चौधरी यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानाराम चौधरी यांचे किराणा मालाचे दुकान असून घरही जवळच आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते 4 जूनला सहकुटुंब राजस्थानला गेले होते. या दरम्यान आरोपींनी त्यांच्या घरावर पाळत ठेवत घर कुलूप बंद असल्याचा फायदा घेत खिडकीच्या ग्रिलचे कुलूप तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील तीन लाख 18 हजार 750 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. नऊ ऑगस्टला चौधरी हे घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी 10 ऑगस्ट रोजी समर्थ पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली.

समर्थ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासांतर्गत त्यांना आरोपी रोहन व उमरान यांनी ही चोरी केल्याचे समजले. त्यांच्यावर पाळत ठेवली असता चोरीचे दागिने विक्रीसाठी गेले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांना अटक करून 100 टक्के माल हस्तगत केला.

ही कामगिरी समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार सुशील लोणकर, राजस शेख, संतोष काळे, पोलीस नाईक टिळेकर, पोलीस शिपाई साहिल शेख, अनिल शिंदे, निलेश साबळे, सचिन पवार, सूरज घनवट, सुमीत खुटे, गणेश कोळी, स्वप्नील वाघोले यांनी केली.

HB_POST_END_FTR-A2

.