Pimpri : साथीच्या आजाराचे थैमान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिकेच्या व खासगी रुग्णालायामध्ये रुग्णांची तुंडुंब गर्दी पाहयला मिळत आहे. साथीच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. थंडी, तापासारख्या व्हारल आजारांमुळे उद्योगनगरी फणफणली आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये 12 हजार 392 रुग्ण तापाचे आढळले. त्यापैकी 4 रुग्णांना मलेरियाची लागण झाली.  281 संशयित रुग्णांपैकी 40 रुग्णांना डेंगीची लागण झाली. जून आणि जुलै महिन्यांमध्ये शहरी भागामध्ये तापाची साथ कमी होती. मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यामध्ये 10 हजार 218 रुग्ण तापाचे आढळले होते. तर, 28 रुग्णांना डेंगीची लागण झाली होती.

जूनमध्ये तापाचे रुग्ण 5 हजार 168 होते. शहरातील अस्वच्छता, कच-याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न आणि सततच्या हवामान बदलामुळे आजारांमध्ये वाढ होत आहे. फेब्रुवारी ते जून या महिन्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात असताना जुलै महिन्यापासून साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मलेरिया, डेंगी आणि स्वाइन फ्ल्यू सदृष्य आजारांचा फैलाव होत आहे. व्हायरल फीव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे.

वातावरणातील बदलाचे कारण

यंदा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या व दुस-या हप्त्यामध्ये शहरामध्ये विक्रमी पावासाची नोंद झाली. त्यामुळे पूरपरिस्थितीही ओढावली. ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली आणि कमाल व किमान तापमानामध्ये वाढ झाली. दिवसा तीव्र उन आणि रात्री बोचरी थंडी अशा प्रकारचे वातावरण तयार झाले असे वातावरण व्हायरल फिव्हरसाठी पोषक असते. ऑगस्ट महिन्यामधील वातावरणातील या बदलामुळे सर्दी, थंडी, तापाच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.