New twist in Sushant case: सुशांत व त्याच्या बहिणीचे धक्कादायक चॅट उघड

14 जून रोजी आत्महत्या करुन जीवन संपवणारा सुशांत 8 जूनपर्यंत त्यांच्या बहिणीच्या प्रियांका सिंहच्या संपर्कात होता.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी आता सीबीआयमार्फत सुरु आहे. या प्रकरणाला दररोज वेगळं वळण मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेले चार दिवस रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. त्यात अनेक नवीन खुलासेदेखील झाले आहेत. यातच आता सुशांतच्या मानसिक स्थितीविषयी त्याच्या बहिणीला प्रियांका सिंहला कल्पना होती अशी नवीन माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तिचे आणि सुशांतचे काही मेसेज समोर आले असून यात तिने सुशांतला काही औषधे सुचवल्याचं सांगण्यात येत आहे.

रियाने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीनुसार ती 8 जून रोजीच सुशांतच्या सांगण्यावरुन त्याचे घर सोडून गेली होती. आणि त्यानंतर तिच्यात आणि सुशांतमध्ये फारसा संपर्क राहिला नव्हता. तसेच 14 जून रोजी आत्महत्या करुन जीवन संपवणारा सुशांत 8 जूनपर्यंत त्यांच्या बहिणीच्या प्रियांका सिंहच्या संपर्कात होता. या दोघांचे मेसेज चॅट समोर आले असून 8 जून रोजी प्रियांकाने सुशांतला काही औषधांची नावं सुचवली होती. यात प्रियांकाने सुशांतला दिल्लीतील एका डॉक्टरांचं प्रिस्किप्शनदेखील दिल्याचं दिसून येत आहे.

‘एक आठवडा Librium हे औषध घे. त्यानंतर दररोज नाश्त्यानंतर एकदा Nexito 10 mg हे घेत जा आणि जर कधी एन्जाइटी अटॅक आला तर Lonazep हे औषध घेत जा’, असे मेसेज प्रियांकाने सुशांतला केले होते. त्यावर ‘सोनू दी, पण कोणत्याही प्रिस्किप्शनशिवाय ही औषधं मिळणार नाहीत’, असा रिप्लाय सुशांतने दिला होता. त्यावर ‘मी पाहते काय करायचं, मी मॅनेज करते’ असं प्रियांका म्हणाली होती.

प्रियांकाने या काळात सुशांतला व्हॉइस कॉलदेखील केला होता. तसंच ‘मला फोन कर मला प्रिस्क्रिप्शन पाठवायचं आहे. माझे एक डॉक्टर मित्र आहेत जे तुझी मुंबईतील सगळ्यात चांगल्या डॉक्टरांसोबत ओळख करुन देतील. सगळं कॉन्फिडेंशिअल आहे. त्यामुळे काळजी करु नकोस’, असं तिने म्हटलं आहे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियावर संशय घेणा-या सुशांतच्या कुटुंबीयांच्या वागण्यामध्ये देखील तफावत दिसून येत आहे. सुशांत आणि प्रियांकामधील हे चॅट मेसेज सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे. तसंच सुशांतच्या आजारपणाविषयी त्याच्या घरातल्यांना कल्पना होती अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.