New Year Party : यंदा 31st च्या पार्ट्या नाही, रात्री साडेदहानंतर पोलीस हॉटेल बंद करणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या संचारबंदीची अमंलबजाणी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हॉटेल हॉटेल रात्री साडेदहा वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

त्याशिवाय ख्रिसमस आणि नववर्षांच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये पार्ट्या होणार नाहीत, त्यासंदर्भात हॉटेल व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.  संचारबंदीची अमंलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. त्यानुसार वाहनचालकांकडे विचारपूस केली जात आहे.

काल रात्री अकरा वाजेपासून सिंहगड, दत्तवाडी, डेक्कन, शिवाजीनगर, बंडगार्डन, वानवडी, हडपसर, स्वारगेट, कोथरूड परिसरात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग केल्याचे दिसून आले. जागोजागी पोलिसांकडून वाहन तपासणीला प्राधान्य देण्यात आले आहे. विनाकारण भटकंती आणि विनामास्क नागरिकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संचारबंदीची अमंलबजावणी करताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सुट देण्यात आली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेताना कोणी आढळल्यास कारवाई करण्याचे सूतोवाच पोलिसांनी केले आहेत.

शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना वेळेआधी सोडा
शहरातील विविध कंपन्यांमध्ये सेकंड शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपनी मालकांनी रात्री अर्धा तास आधी प्रवासाला मुभा द्यावी. कंपनीतील कामगार संचारबंदीतील वेळेआधी घरी पोहचेल यासंदर्भात खबरदारी घेण्याची सूचना पोलिसांनी कंपनी प्रशासनाला दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांविरूद्ध कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.