New York: अमेरिकेत सलग चौथ्या दिवशीही मृत्यूचे थैमान, एका दिवसात 1900 बळी!

जगात एका दिवसात 7235 बळी, फ्रान्समध्ये 1,341 मृत्यू

एमपीसी न्यूज – जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः मृत्यूचे तांडव चालवले दिला आहे. अमरिकेत मंगळवारी एका दिवसात तब्बल 1 हजार 970, बुधवारी एका दिवसात 1 हजार 926 बळी गेले होते. काल (गुरुवारी) एका दिवसात 1,900 बळी गेले. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा 16 हजार 691 इतका झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येने साडेचार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

जगातील कोरोनाबाधितांपैकी 28 टक्के कोरोनाबाधित हे अमेरिकेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 68 हजार 566 असून आतापर्यंत 16 हजार 691 जणांचा मृत्यू झाला असून 25 हजार 928 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत अजून 4 लाख 25 हजार 947 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 10 हजार 11 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत सोमवारी एका दिवसात 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर मंगळवार, बुधवार व गुरुवार या तिन्ही दिवशी ही संख्या जवळपास दोन हजारपर्यंत पोहचल्याने अमेरिकेत सर्वांची झोप उडाली आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 1 लाख 61 हजार 504 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 7,067 पर्यंत वाढला आहे. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 51 हजार 027 झाली असून बळींची संख्या 1 हजार 700 पर्यंत जाऊन धडकली आहे. मिशीगन, कॅलिफोर्निया, ल्युसियाना, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती ढासळत चालल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरीे प्रयत्न सुरू असून लवकरच अमेरिका कोरोनावर मात करील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने संकटाशी मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मृत्यूंचे थैमान – 7,235 बळी! गुरुवारी एका दिवसांत गेलेले कोरोना बळी!

अमेरिका – 1 हजार 900

फ्रान्स – 1 हजार 341

यू. के. – 881

स्पेन – 655

इटली – 610

बेल्जियम – 283

जर्मनी – 258

नेदरलँड्स – 148

ब्राझील – 134

इराण – 117

स्वीडन – 106

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.