New York: अमेरिकेत कोरोनाचे सलग तिसऱ्या दिवशीही ‘कत्ल-ए-आम’, बुधवारी 1,926 बळी!

जगात बुधवारी 7383 बळी, फ्रान्समध्ये एका दिवसात 1417 तर ब्रिटनमध्ये 786 बळी!

एमपीसी न्यूज – जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः कत्ल-ए-आम चालवले दिला आहे. अमरिकेत मंगळवारी एका दिवसात तब्बल 1 हजार 970 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. काल (बुधवारी) देखील एका दिवसात 1 हजार 926 बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा 14 हजार 774 इतका झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

जगातील कोरोनाबाधितांपैकी 28 टक्के कोरोनाबाधित हे अमेरिकेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 34 हजार 062 असून आतापर्यंत 14 हजार 774 जणांचा मृत्यू झाला असून 22 हजार 580 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत अजून 3 लाख 96 हजार 708 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 9 हजार 279 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत सोमवारी एका दिवसात 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला होता. मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी ही संख्या जवळपास दोन हजारपर्यंत पोहचल्याने अमेरिकेत सर्वांची झोप उडाली आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 1 लाख 51 हजार 171 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 6,268 पर्यंत वाढला आहे. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 437 झाली असून बळींची संख्या 1 हजार 504 पर्यंत जाऊन धडकली आहे. मिशीगन, कॅलिफोर्निया, ल्युसियाना, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती ढासळत चालल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरीे प्रयत्न सुरू असून लवकरच अमेरिका कोरोनावर मात करील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने संकटाशी मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मृत्यूंचे तांडव 7,383 बळी! बुधवारी एका दिवसांत गेलेले कोरोना बळी!

अमेरिका – 1 हजार 926

फ्रान्स – 1 हजार 417

यू. के. – 786

स्पेन – 704

इटली – 604

बेल्जियम – 403

नेदरलँड्स – 234

जर्मनी – 206

इराण – 133

ब्राझील – 122

स्वीडन – 114

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.