New York: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! एका दिवसात 1,970 बळी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या चार लाखांवर!

एमपीसी न्यूज – जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. अमरिकेत काल (मंगळवार) एका दिवसात तब्बल 1 हजार 970 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा 12 हजार 841 इतका झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

जगातील कोरोनाबाधितांपैकी 28 टक्के कोरोनाबाधित हे अमेरिकेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 412 असून आतापर्यंत 12 हजार 854 जणांचा मृत्यू झाला असून 21 हजार 674 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत अजून 3 लाख 65 हजार 884 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 9 हजार 169 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत सोमवारी एका दिवसात 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी ही संख्या जवळपास दोन हजारपर्यंत पोहचल्याने अमेरिकेत सर्वांची झोप उडाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 1 लाख 42 हजार 384 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 5,489 पर्यंत वाढला आहे. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 416 झाली असून बळींची संख्या 1 हजार 232 पर्यंत जाऊन धडकली आहे. मिशीगन, कॅलिफोर्निया, ल्युसियाना, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती ढासळत चालल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून लवकरच अमेरिका कोरोनावर मात करील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने संकटाशी मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.