New York: अमेरिकेत पाचव्या दिवशीही मृत्यूचे थैमान, एका दिवसात 2,035 बळी, मृतांची एकूण संख्या 18,747!

कोरोनाबाधितांची संख्या देखील पाच लाखांच्या वर

एमपीसी न्यूज – जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः मृत्यूचे तांडव चालवले दिला आहे. अमरिकेत दिवसातील बळींचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने चिंतेत भर पडली आहे. काल (शुक्रवारी) एका दिवसात कोरोनाबाधित 2035 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा 18 हजार 747 इतका झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

अमेरिकेत सोमवारी एका दिवसात 1 हजार 200, मंगळवारी एका दिवसात 1 हजार 970, बुधवारी एका दिवसात 1 हजार 926 बळी गेले होते. गुरुवारी एका दिवसात 1,900 बळी गेले होते. त्यात शुक्रवारी वाढ होऊन एका दिवसात 2,035 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

जगातील कोरोनाबाधितांपैकी 29.6 म्हणजे जवळजवळ 30 टक्के कोरोनाबाधित हे अमेरिकेत आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 02हजार 876 असून आतापर्यंत 18 हजार 747 जणांचा मृत्यू झाला असून 27 हजार 314 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत अजून 4 लाख 56 हजार 815 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 10 हजार 917 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत सोमवारी एका दिवसात 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या चारही दिवशी ही संख्या जवळपास दोन हजारपर्यंत पोहचल्याने अमेरिकेत सर्वांची झोप उडाली आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 1 लाख 72 हजार 358 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 7,844 पर्यंत वाढला आहे. काल (शुक्रवारी) न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात 777 कोरोना बळी गेेले आहेत. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 588 झाली असून बळींची संख्या 1 हजार 932 पर्यंत जाऊन धडकली आहे. मिशीगन, कॅलिफोर्निया, ल्युसियाना, मॅसेच्युसेट्स, फ्लोरिडा, पेनसिल्वानिया, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती ढासळत चालल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरीे प्रयत्न सुरू असून लवकरच अमेरिका कोरोनावर मात करील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने संकटाशी मुकाबला करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मृत्यूंचे थैमान – 6,971 बळी! शुक्रवारी एका दिवसांत गेलेले कोरोना बळी!

अमेरिका – 2 हजार 35

फ्रान्स – 987

यू. के. – 980

स्पेन – 634

इटली – 570

बेल्जियम – 496

जर्मनी – 129

इराण – 122

नेदरलँड्स – 115

ब्राझील – 114

टर्की – 98

स्वीडन – 77

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.