IND V/S SL 2nd ODI : नवोदित दीपक चहरचा ‘कहर’

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – रोमहर्षक सामन्यात नवोदित चहरने केला कहर, श्रीलंकेच्या घशातून घास काढून सामन्यासह जिंकली मालिका कोलंबो येथील प्रेमदासा मैदानावर झालेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात क्रिकेटमधील प्रत्येक अनुभव, थरार, अनिश्चितता, उत्कंठा आदी सर्व गोष्टी क्रिकेटरसिकांना अनुभवता आल्या.

लंकन कर्णधार आजही नाणेफेक जिंकला आणि त्याने परवाच्या सामन्याप्रमाणे आजही फलंदाजी स्वीकारली आणि त्यांच्या सलामीच्या फर्नांडो आणि भानुका यांनी कर्णधाराचा निर्णय योग्य आहे हे सप्रमाण सिद्ध करण्याचा विडा उचलल्यागत फलंदाजी करायला सुरुवातही केली. 13 षटकातच जवळपास सहाच्या सरासरीने धावा जोडून त्यांनी उत्तम सलामी दिली. मात्र उत्तम खेळत असतानाच भानुकाला चहलने मनीष पांडेद्वारे झेलबाद करून यजमानांना पहिला धक्का दिला.

पाठोपाठ राजपक्ष याला चहलने शून्यावरच आल्या पाऊली तंबूत पाठवून दुसरा धक्का दिला.मात्र दुसऱ्या बाजूने फर्नांडोने आपले अर्धशतक पूर्ण करत आपली जबाबदारी चोख बजावली आणि तो आज मोठी खेळी खेळेल असे वाटत असतानाच त्याची शिकार भुवनेश्वरने केली.

यानंतर धनंजय डिसिल्वा  आणि असलंकाने चांगली भागीदारी करत डाव सावरला.आणि शेवटी शेवटी करुणारत्नेच्या आक्रमक फलंदाजीमुळे श्रीलंका संघाने निर्धारित पन्नास षटकात 275 धावांचे सन्मानजनक लक्ष भारतीय संघापुढे ठेवले.

भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमार याने चांगली गोलंदाजी करत तीन तर दीपक चहरने 2 व यजुर्वेद चहलने तीन बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.

पहिल्या सामन्यात धडाकेबाज विजय नोंदवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास आणि देहबोली कमालीची होती, त्यामुळे आजही संघ सहज विजय मिळवून आजच मालिका जिंकेल असा आशावाद भारतीय समर्थक बाळगत होते, मात्र क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते याची पुनर्प्रचिती भारतीय संघाची फलंदाजी चालू असताना वारंवार आली.

पहिल्या सामन्यातल्या सामनावीर पृथ्वी शॉ आज लवकरच बाद झाला, पाठोपाठ ईशान किशन आणि कर्णधार शिखर धवन सुद्धा. तीन बाद 65 अशी बिकट परिस्थिती असताना मनीष पांडे आणि नवोदित पण भारतीय संघ ज्याच्याकडे एक उज्ज्वल भविष्य म्हणून बघतो तो सूर्यकुमार यादव यांनी दडपणाखाली न खचता दर्जेदार आणि आश्वासक फलंदाजी सुरू ठेवली, मात्र दुर्दैवाने मनीष पांडे धावबाद झाल्याने आणि हार्दिक पांड्या शून्य धावसंख्येवर तंबूत परतला.

आज काही तरी विपरीत घडणार असे वाटायला लागले होते, मात्र हार्दिकचे फलंदाजीतले अपयश भरून काढायचे काम त्याचा भाऊ कृणालने केले, मात्र अर्धशतक करून बाद झालेल्या सूर्यकुमार नंतर तोही महत्वपूर्ण अशा 37 धावा काढून बाद झाला.

त्यानंतर मैदानावर आला दीपक चहर, जो त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. समोर विशाल लक्ष होते आणि मागे केवळ तळाचे फलंदाज उरलेले. मात्र या कशाचाच विचार न करता दीपकने आपल्या नावाप्रमाणेच तळपण्याचे व्रत चालू ठेवले आणि भुवनेश्वर कुमारला सोबत घेऊन सुरुवातीपासूनच लंकन गोलंदाजांवर एकेरी, दुहेरी सोबत चौकार – षटकार मारत भागीदारी फुलवत फुलवत ठेवून एक अशक्यप्राय वाटणारा विजय सहज मिळवून दिला.

अर्धशतकी खेळी केलेल्या दीपक चहरला पायात गोळे आल्यानंतर उपचारही घ्यावे लागले, पण या शूरवीर खेळाडूने आपले मोल जाणून मैदानावर शेवटपर्यंत उभे राहण्याची इच्छाशक्ती दाखवली आणि इतिहास घडवला.त्याने भुवनेश्वर कुमार बरोबर 87 धावा जोडताना दुसरी मोठी आठव्या गड्यासाठीची भागीदारी नोंदवली.

योगायोग म्हणजे पाहिली विक्रमी भागीदारी सुद्धा भुवनेश्वरच्याच नावे आहे, त्याने याच संघाविरुद्ध धोनी बरोबर वैयक्तिक अर्धशतक नोंदवले होते, यावेळी त्याने चहरला उत्तम साथ देत संघाला एक अविस्मरणीय विजय  मिळवून देताना नाबाद राहण्याची कामगिरी सुद्धा केली.

आधी गोलंदाजीत दोन बळी घेणाऱ्या दीपकने फलंदाजीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.भारतीय संघाने दैदिप्यमान कामगिरी करत दुसऱ्या सामन्यासोबत मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम सुद्धा करून दाखवत, राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची भावी फळी सुद्धा किती उज्ज्वल आणि पराक्रमी असेल, याची नांदी क्रिकेटजगताला दाखवून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.