Nigdi : प्रत्येक गोष्टीला किंमत असून या जगात काहीही विनामूल्य नाही- स्वामी अमृतास्वरुपानंद पुरी

माता अमृतानंदमयी मठ येथे अयुध प्रादेशिक प्रशिक्षण शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज- “जगभरातील संस्कृतींमध्ये परत देण्याची परंपरा आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत असते, या जगात काहीही विनामूल्य नाही. या शिबिरात सहभागी झालेला पत्येकजण या शिबिराचा फायदा घेईल परंतु, या शिबिराद्वारे प्रत्येकाच्या मनात बिंबवण्यात आलेल्या शिस्त आणि कठोर परिश्रमाची किंमत भविष्यात प्रत्येकाला मोजावी लागणार आहे” असे मत माता अमृतानंदमयी मठाचे स्वामी अमृतास्वरुपानंद पुरी यांनी व्यक्त केले.

निगडीतील माता अमृतानंदमयी मठ येथे अयुध प्रादेशिक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन मठाचे प्रभारी स्वामी विद्यामृतानंदपुरी यांनी केले. या प्रसंगी स्वामी अमृतास्वरुपानंद पुरी भारतीय संस्कृती या विषयावर बोलत होते.

या शिबिरामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, छत्तीसगड आणि तामिळनाडूमधील २०० हून अधिक तरुण सहभागी झाले होते. आयुष प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरात शांततापूर्ण जगाच्या भविष्यासाठी आपले लक्ष्य तयार करण्यासाठी हे सर्व युवक एकत्र आले होते. अयुध (अमृता युवा धर्म धार) ही माता अमृतानंदमयी मठाची आंतरराष्ट्रीय युवा शाखा आहे. अयुध अध्याय 40 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहेत. या शिबिरामध्ये सनातन धर्मातील प्रेरणादायक व्यक्ती, टीम बिल्डिंग आणि जीवन कौशल्य कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, योग आणि ध्यान सत्र, सांस्कृतिक दौरे आणि साहसी खेळ यांच्याद्वारे प्रेरणादायक चर्चासत्र पार पडले.

अहमदाबाद येथील इंडस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.मुरुगानंत यांनी भौतिक शास्त्रज्ञ अध्यात्म विज्ञान यावर आपले विचार व्यक्त केले. अमृता स्कूलमधील अमृता सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड रिसर्चचे संशोधन संचालक पी. राम मनोहर यांनी आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल अंतर्दृष्टी दिली. प्रख्यात कर्नाटक संगीतकार पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांनी एक संगीत कार्यशाळा आयोजित केली. वायुवा ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक पुंडलिक सीताराम वाघ यांनी संत ज्ञानेश्वर समाधी, आळंदी पुणे येथे सांस्कृतिक सहलीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रसाद देवळे व टीम झेड बीएसी अ‍ॅडव्हेंचर यांनी भगवद्गीतेवर आधारित निर्भयता या विषयावर आउटडोअर गेम आयोजित केले. न्यू इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कु.लक्ष्मी मेनन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये आव्हानांना तोंड देण्यासाठी अम्मा यांनी कशी मदत केली याबद्दल त्यांचा अनुभव कथन केला. त्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात आली.

सर्व सहभागींनी शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. स्वतःला कमी लेखू नका, नेहमीच आनंदी रहा, अध्यात्म अधिक शिकण्याचा प्रयत्न करा, सांघिक कार्याचे महत्त्व शिका, धैर्यशील बाणा आणि नेहमीच संतुलित राहा. असा संदेश या शिबिरातून मिळाला असल्याची भावना शिबिरार्थींनी व्यक्त केली. दररोज नियमित ध्यान आणि योग करणार असा निर्धार त्यांनी केला. शिबिरार्थी म्हणाले, ” जीवनात आनंदी, सकारात्मक आणि कृतज्ञ कसे राहावे, अहंकाराला कसे शरण जावे आणि आपल्या चुका कशा स्वीकाराव्यात हे शिकता आले. देणे ही या जगामधील सर्वात महत्वाची गोष्ट असून केवळ देऊन आपण आनंदी होऊ शकतो. अम्मा हे आमच्यासाठी सतत प्रेरणास्थान आहे. आमच्या धर्माबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आमच्यामध्ये निर्माण झाली”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.