Akurdi : नाईसचा पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि विकास उपक्रमात पुढाकार

सरकारी शाळांमध्ये दोन विज्ञान केंद्रे प्रायोजित करणार

एमपीसी न्यूज – नाईस (NICE) कंपनीने अगस्त्या फौंडेशनच्या सहयोगाने आज पुणे येथे त्यांच्या नवीन सीएसआर उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमांतर्गत कंपनी सरकारी शाळांमध्ये दोन विज्ञान केंद्रे प्रायोजित करणार आहे. या दोन शाळांमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच पुणे जिल्हा शिक्षण संघटना यांचा समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नाईस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना ज्ञान तसेच शिक्षणाबरोबर डिजिटल साक्षर करण्यासाठी आपले योगदान देणार आहे.

या उपक्रमाची घोषणा नाईसचे एंटरप्राइज ग्रुप प्रेसिडेंट बॅरी कुपर आणि नाईस इंडिया जीटीसी (ग्लोबल टॅलेंट सेंटर)चे प्रमुख आणि कंपनीचे उपाध्यक्ष विजय गोंडी यांनी दिली. उपक्रमाच्या शुभारंभाचा हा कार्यक्रम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथेआयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाची माहिती देताना एंटरप्राइज ग्रुपचे अध्यक्ष बॅरी कुपरयांनी सांगितले की, “आम्ही नाईसच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांच्या सोबतच समाजाशी कटिबद्ध राहत असतो. त्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवून आमचे सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहतो. आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे शाळांनीही आपल्या शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी नाविन्यपूर्ण आणि क्रियाशील अशा शैक्षणिक साधनांचा वापर अतिशय उपयुक्त ठरू शकतो. आम्ही प्रायोजित करत असणाऱ्या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संबंधित दोन शाळांमध्ये शिक्षण मजेदार तर होईलच याशिवाय त्यामधील विद्यार्थी चांगल्या भविष्याच्या दृष्टीने सक्षम होतील.”

विज्ञान केंद्रातील अध्यापन पद्धती प्रामुख्याने प्रायोगिक तत्त्वावरच आधारलेली असेल. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कुतूहल बुद्धी, सृजनशीलता तसेच नेतृत्वगुण यांच्या वाढीस चालना मिळेल. याशिवाय या अध्यापन पद्धतीसाठी शिक्षकांकडून वापरली जाणारी बहुतेक मॉडेल्स शाश्वत स्वरूपाची तसेच पर्यावरण पूरक असतील. आपल्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून नाईस यावर्षी सदरच्या विज्ञान केंद्रांसाठी 36 लाख रुपये तर पुढील दोनवर्षांसाठी आणखी 50 लाख रुपये गुंतवणूक करणार आहे.

नाईस नेहमीच आपल्या ग्राहकांचे समाधान, शाश्वत पर्यावरण तसेच कॉर्पोरेट सिटिझनशिप प्रती नितांत कटिबद्ध असते. कंपनीचा नेहमीच विचार राहिला आहे की आजचे विद्यार्थी हे उद्याचे अभियंते असून त्यांच्या शिक्षणावरच आपले भविष्य अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षात नाईसने डोअर स्टेप स्कूल (डीएसएस) आणि आकांक्षा फाऊंडेशनच्या सहयोगाने वंचित घटकातील मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी निधी पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे  .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.