Nigadi News: विरंगुळा केंद्रास प्रवीण खिल्लारे, सीताराम धोंडू रहाटे यांचे नाव द्या – सचिन चिखले

एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर येथील सद्गुरु दत्त उद्यानातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रास (क्लब हाऊस) दिवंगत प्रवीण खिल्लारे व दिवंगत सीताराम धोंडू रहाटे असे नामकरण करावे, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील यमुनानगरमधील सद्गुरु दत्त उद्यानात महापालिकेच्या वतीने विरंगुळा केंद्राची निर्मिती केली आहे. या भागात विरंगुळा केंद्र व्हावे, यासाठी कै. सीताराम रहाटे आणि कै. प्रवीण खिल्लारे यांनी मोठे योगदान दिले आहे. ज्येष्ठांची मोट बांधून त्यांना एकत्र आणले.

हे कार्य करीत असतानाच रहाटे यांचे 2017 मध्ये निधन झाले. तर, प्रवीण खिल्लारे यांना कोरोना काळामध्ये सामाजिक कार्य करीत असतानाच देवाज्ञा झाली.
सामाजिक क्षेत्रात या दोन्ही जेष्ठांचे काम वाखाणण्याजोगे होते. या दोन्ही व्यक्ती आमच्यासाठी व समाजातील सर्वच स्तरासाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांची नावे द्यावीत.

तसेच या विरंगुळा केंद्रातील दर्शनी भागात दोन सभागृह आहेत. यात खाली असणाऱ्या सभागृहास कै. प्रकाश आप्पा काळभोर व वर असणाऱ्या सभागृहास कै. शशिकांत दिगंबर गडवे असे नाव देण्यात यावे, अशी यमुनानगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.

या मागणीची दखल घेऊन आपण तात्काळ नामकरणाचा ठराव मंजूर करावा. जेणेकरून प्रभागातील नागरिकांना या सद्विवेकी व थोर पुरुषांचे कार्य त्यांच्या नावारूपाने कायम समरणात राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.