Nigdi : चार कारवायांमध्ये सहा आरोपींकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त; निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज -निगडी पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिस्तूल, वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणा-या सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 4 लाख 22 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

त्रिवेणीनगर परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक सतीश ढोले आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल मिसाळ यांना माहिती मिळाली की, भक्ती शक्ती चौक येथे एका कमानीजवळच्या रोडवर दोन तरुण दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सनी गौतम घाडगे (वय 20, रा. जिजामाता चौक, हरिओम कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. पातळशेत, ता. रोहा, जि. रायगड) आणि सोमनाथ ऊर्फ सोम्या साहेबराव भगत (वय 19, रा. पत्राशेड, अजंठानगर, निगडी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 16 मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकल असा 2 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

आकुर्डीमधील आंध्रा बँकेच्या समोरील रोडवरून एकल ताब्यात घेऊन एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे तर जुना जकात नाका निगडी येथून एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देखील एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सुधाकर ऊर्फ पिंटू तुकाराम सूर्यवंशी (वय 30, रा. बौध्दनगर, ओटास्कीम, निगडी), सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 22, रा. विकासनगर, तरसवस्ती, देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर निगडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी मधील अंकुश चौकाजवळ दोन मुले मेस्ट्रो दुचाकीवर (एमएच 14 / जी आर 9126) थांबले आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे. अशी माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. संतोष अनिल गायकवाड (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी), गणेश सखाराम कोंडेकर (वय 21, रा. माले भांबुर्डे रामवाडी, ता. मुळशी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किमतीच्या एकूण दोन दुचाकी जप्त केल्या.

एकूण सर्व कारवायांमध्ये निगडी पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे, दुचाकी चोरी आणि मोबाईल चोरी करणा-या सहा आरोपींकडून 16 मोबाईल फोन, 4 मोटारसायकल आणि 2 पिस्टल असा एकूण 4 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, रमेश मावसकर, सतीश ढोले, विलास केकाण, राहुल मिसाळ, विजय बोडके, मितेश यादव, गणेश शिंदे, सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.