Pimpri : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये निगडी पोलीस ठाणे आघाडीवर

एमपीसी न्यूज – बलात्कार, विनयभंग, महिला छेडछाड या घटना पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शहराची ओळख औद्योगिक नगरी ऐवजी गुन्हेगार नगरी अशी होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मागील दीड वर्षात निगडी पोलीस ठाण्यात सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारांना अटक करून त्यांना शिक्षा होत असली तरीही या आकडेवारीत घट होताना मात्र दिसत नाही. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्या नीता परदेशी यांनी याबाबतची माहिती – माहिती अधिकारात मागवली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी आणि निगडी या पाच पोलीस ठाण्यात जानेवारी 2017 ते जुलै 2018 या दीड वर्षात बलात्काराचे 70 गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्यातील 74 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर विनयभंग आणि छेडछाडीच्या 162 घटना दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांनी 96 आरोपींना अटक केली.

भाजप नेत्या नीता परदेशी यांनी मागवलेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षात बलात्काराच्या घटना पिंपरी पोलीस ठाण्यात आठ, चिंचवड एक, भोसरी 16, एमआयडीसी भोसरी 19 आणि निगडी पोलीस ठाण्यात 26 दाखल झाल्या आहेत. या दाखल गुन्ह्यांमधील भोसरी पोलिसांनी 14, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी 18 आणि निगडी पोलिसांनी 42 गुन्हेगारांना अटक केली आहे.

महिला छेडछाड आणि विनयभंगाच्या पिंपरी पोलीस ठाण्यात 66, चिंचवड 12, भोसरी 25, एमआयडीसी 12 आणि निगडी पोलीस ठाण्यात 46 घटना दाखल करण्यात आल्या. त्यातील भोसरी पोलिसांनी 20, एमआयडीसी भोसरी 12 आणि निगडी पोलिसांनी 64 आरोपींना अटक केली आहे.

लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना महिलांनी पुढाकार घेऊन तक्रार दिल्याने, तसेच शाळकरी मुलींना आलेल्या अडचणी आणि अन्य कारणांमुळे पालकांनी दाखल केलेल्या आहेत. अशा कित्येक घटना असतील ज्या सामाजिक दबावापोटी दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील ही आकडेवारी निश्चित वाढणारी आहे. ही बाब औद्योगिक विकासात पुढारलेल्या शहराला काळिमा फासणारी आहे. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे अनेक शालेय विद्यार्थिनींना त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची जाणीव देखील होत नाही. अनेक दिवसानंतर या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये याबाबतचे शिक्षण देणे आवश्यक आहे. महिलांनी देखील सामाजिक दबावाला बळी न पडता पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करायला हवेत. गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा धाक बसवणे आवश्यक आहे.

नीता परदेशी म्हणाल्या, “शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरात अवैध दारू धंदे, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यावर पोलिसांचा वाचक राहिला नाही. पिंपरी-चिंचवड शहरात देश-विदेशातून महिला नोकरीनिमित्त येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेसाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हवी. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांसंबंधी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्य महिला आयोग आणि पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. जर या घटना कमी झाल्या नाहीत तर संबंधित पोलीस ठाण्यासमोर भाजप महिला मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.