Nigadi : प्राधिकरणात मोफत कोरोना टेस्टिंग केंद्र सुरु करा – बाळा दानवले

Start a free corona testing center in the pradhikaran - bala Danavale : खाजगी दवाखान्यात कोरोना तपासणीसाठी 2500 / 2800 रुपये खर्च करावा लागतो.

एमपीसीन्यूज : निगडी प्राधिकरण येथे महापालिकेच्या वतीने मोफत कोरोना टेस्टिंग सेंटर चालू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी महापालिकेकडे केली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, प्राधिकरणमधील नागरिकांना मोफत कोरोना टेस्टिंग करण्यासाठी यमुनानगर व आकुर्डी येथील पालिकेच्या दवाखान्यात जावे लागते.

या दोन्ही दवाखान्यात स्थनिक नगरसेवक व त्या भागातील नागरिकांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे प्राधिकरणमधील नागरिकांना दोन ते तीन दिवसांची वेळ दिली जाते.

त्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण असतानाही नाइलाजाने त्यांना खाजगी दवाखान्यात कोरोनाची तपासणी करावी लागत आहे. या तपासणीसाठी 2500 / 2800 रुपये खर्च करावा लागतो.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत घरातील एक व्यक्तीला कोरोनची लागण झाल्यास घरातील सर्व सदस्यांना टेस्टिंग करावी लागते.

कोरोना टेस्टसाठी येणार खर्च जास्त असल्याने प्राधिकरणमधील नागरिकांसाठी हेगडेवार भवन शेजारील बॅडमिंटन हाॅलमध्ये मोफत कोरोना टेस्टिंग सेंटर करावे.

बॅडमिंटन हाॅल परिसरात नागरिकांना गाडी पार्किंगची सोय आहे. तसेच ही जागा चारही बाजूने बंदिस्त असल्याने कोरोना टेस्टिंगसाठी सोयीची असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर मनसेचे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष दिपेन नाईक, किरण ठुबे, प्रसाद मराठे, ऋषिकेश कांबळे, भागवत नागपुरे, जयेश मोरे, रोहित शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.