Nigadi : ‘त्या’ शालेय विद्यार्थिनींवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी

युवराज दाखले यांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांची भेट

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निगडी येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शस्त्रे बाळगल्याच्या कारणावरून शालेय विधार्थीनींवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, या मागणीसाठी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी आज (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली.

निगडी येथील विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत शालेय विद्यार्थिनींच्या हाती असलेली शस्त्रे ही प्रतिकात्मक होती. मात्र, पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करत जाणीवपूर्वक आणि सूडबुद्धीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे शिवशाही व्यापारी संघाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

  • कार्यकर्त्यांबरोबरच शोभायात्रेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थीनींवर देखील पोलिसांनी जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले असून स्वरक्षणार्थ सुरक्षेचे धडे गिरविणे चुकीचे आहे का? असा सवाल दाखले यांनी उपस्थित केला.

गुन्हे दाखल झाल्यामुळे शालेय विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार असून याची गंभीर दखल घेत या विद्यार्थिनींवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला द्यावेत, अशी विनंती वजा मागणी दाखले यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.