Nigdi : उसने घेतलेल्या पैशांवरून हाणामारी प्रकरणी दोघांना अटक; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – उसने पैसे परत दिले नाहीत म्हणून देणारा आणि घेणारा यांच्यात जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री निगडी येथे घडली.

 

शंकर भीमराव लष्करे (वय 45) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मारुती गुंडाप्पा पवार (वय 47, दोघेही रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती यांनी शंकर यांना एक हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे मागण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. पैसे मागत असताना आरोपी मारुती याने शंकर यांना शिवीगाळ करून विट फेकून मारली. तसेच लोखंडी कोयत्याने शंकर यांच्या डोक्यात वार केले.

 

याच्या परस्पर विरोधात मारुती गुंडाप्पा पवार यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये शंकर भीमराव लष्करे आणि अविनाश लष्करे (वय 20) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती यांनी आरोपी शंकर यांना एक हजार रुपये हातउसने दिले होते. रविवारी रात्री मारुती यांनी शंकर यांच्याकडे उसने दिलेले पैसे मागितले. यावरून शंकर याने मारुती यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मातीची वीट फेकून मारली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी शंकर आणि त्याचा साथीदार अविनाथ या दोघांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.