Nigdi: ‘अ’ परिमंडळमधील आणखी 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, कार्यालय पुन्हा बंद राहण्याची शक्यता

Nigdi: 2 more employees in ‘A’ circle infected with corona, possibility of office closure again याच परिमंडळ कार्यालयातील लिपिक गुरुवारी (दि.16) पॉझिटिव्ह सापडला होता. त्यामुळे कार्यालय पुढील आठ दिवसासाठी बंद करण्यात आले होते.

एमपीसी न्यूज – निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल इमारतीमध्ये असलेल्या ‘अ’ परिमंडळ रेशनिंग कार्यालयातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एक पुरुष पुरवठा निरीक्षक आहे तर दुसऱ्या महिला लिपिक आहेत. कार्यालयातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कार्यालय पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली. या चाचणीचा शनिवारी (दि.25) अहवाल आला असून तो सकारात्मक आला आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिला लिपिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.

दरम्यान, याच परिमंडळ कार्यालयातील लिपिक गुरुवारी (दि.16) पॉझिटिव्ह सापडला होता. त्यामुळे कार्यालय पुढील आठ दिवसासाठी बंद करण्यात आले होते. तसेच लिपिकाच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर आता याच कार्यालयातील आणखी दोन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे परिमंडळ कार्यालयातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता तीन वर पोहोचला आहे.

परिमंडळ कार्यालयातील लिपिक 16 जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर कार्यालय पुढील आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. तसेच शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 19 जुलै रोजी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर 20 जुलै रोजी कार्यालय सुरू करण्यात आले होते.

मात्र, कार्यालयातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कार्यालय आणखी काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

परिमंडळ अधिकारी नायब तहसीलदार दिनेश तावरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, कार्यालयातील एकूण तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इतर कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे परिमंडळ कार्यालय अ व ज विभाग पुढील काही दिवस बंद ठेवण्याची गरज आहे. याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी यांना पत्र पाठवले असल्याचे दिनेश तावरे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता दोन्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये 14 जुलैच्या मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास साडेसहा हजार रुग्ण वाढले असल्याचे दिसून आले आहे. 23 जुलै नंतर राज्य शासनाच्या नियमानुसार शहरात लॉकडाऊनचे नियम लागू राहतील असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.