Nigdi : वृद्ध महिलेच्या हातावर छड्या मारून पळवला 4 लाख 30 हजारांचा ऐवज

हा प्रकार सोमवारी (दि. 10) रात्री अकरा वाजताच्या सुमारास गायत्री हेरीटेज या निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीत घडला. : 4 lakh 30 thousand was stolen by hitting an old woman with a stick

एमपीसी न्यूज – दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या हातावर छड्या मारून तिला जखमी केले. त्यानंतर तिच्या अंगावरील आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, मोबईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

हा प्रकार सोमवारी (दि. 10) रात्री अकरा वाजताच्या सुमारास गायत्री हेरीटेज या निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीत घडला.

याप्रकरणी हेमलता मलगौडा पाटील (वय 76, रा. गायत्री हेरीटेज, सेक्टर नंबर 24, प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमलता यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना एकुलती एक मुलगी आहे. मुलीच्या लग्नानंतर हेमलता त्यांच्या घरात एकट्याच राहत होत्या.

सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हेमलता टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे हेमलता त्यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्या हातावर छडीने मारून जखमी केले.

त्यानंतर चोरट्यांनी हेमलता यांच्या अंगावरील दागिने, घरातील सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, मोबईल आणि रोख रक्कम, असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मंगळवारी सकाळी हेमलता यांना निगडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. निगडी पोलिसांनी आरोपींच्या शोधात पथके तयार करून रवाना केली आहेत.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.