Nigdi: ‘अ’ परिमंडळ कार्यालयातील लिपीक कोरोना पॅाझिटिव्ह; पुढील 8 दिवस रेशनिंग कार्यालय बंद

Nigdi: 'A' Circle Office Clerk found Corona Positive; Ration office closed for next 8 days या लिपिकाच्या संपर्कात आलेले नायब तहसीलदार दिनेश तावरे यांच्यासह इतर अठरा कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल इमारतीमध्ये असलेल्या ‘अ’ परिमंडळ रेशनिंग कार्यालयातील लिपिकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या परिमंडळ कार्यालयाच्या नायब तहसीलदारांसह अठरा कर्मचाऱ्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस हे रेशनिंग कार्यालय बंद राहणार आहे.

या लिपिकाची बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल गुरुवारी (दि.16) पॉझिटिव्ह आला. तसेच, या लिपिकाच्या संपर्कात आलेले नायब तहसीलदार दिनेश तावरे यांच्यासह इतर अठरा कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कामासाठी विश्रांतवाडी ते निगडी असा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या लिपिकाला किरकोळ ताप आणि घशात खवखव जाणवत होती. परिमंडळ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्याला चाचणी करण्यास सांगितली.

दरम्यान, त्यांचा कोरोना चाचणी अहवाल हा सकारात्मक आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’ बोलताना नायब तहसीलदार दिनेश तावरे म्हणाले, कार्यालयातील आम्ही सर्वजण होम क्वारंटाइन झालो आहोत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस रेशनिंग कार्यालय उच्च अधिकाऱ्याच्या परवानगीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तावरे पुढे म्हणाले, निगडी येथील रेशनिंग कार्यालयात दररोज 200 ते 250 लोक गर्दी करत असतात. या कार्यालयाशी मागील एक आठवड्यात ज्या लोकांचा संपर्क आला आहे त्यांनी स्वतःला काही दिवस आयसोलेट करावे. गरज भासल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.