Nigdi : चोरलेली दुचाकी तब्बल 21 किलोमीटर ढकलत आणणा-या सराईत चोरट्यास अटक

सुमारे 10 लाख 90 हजारांच्या 13 दुचाकी जप्त; निगडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – वाहन चोरट्याने एका चोरीच्या गुन्ह्यात कहर केला. त्याने पुण्यातून चोरलेली एक दुचाकी चालू होत नाही म्हणून तब्बल 21 किलोमीटर पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी ढकलत आणली. या सराईत वाहन चोरट्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 10 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 13 महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

बुद्धदेव विष्णू विश्वास (वय 21, रा. दत्तवाडी, आकुर्डी. मूळ रा. स्टील दुर्गापूर, जि. बौद्धमाना, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या वाहन चोराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मावसकर यांना माहिती मिळाली की, थरमॅक्स चौक येथे एक तरुण बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरत आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याजवळ असलेली बुलेट गाडी चोरीची असल्याचे सांगितले.

तसेच त्याने निगडी, डेक्कन, हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड या भागातून 13 मोटारसायकल चोरल्या असल्याचे देखील सांगितले. त्याच्याकडून 13 दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 90 हजार रुपये कितमीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील पाच, डेक्कन, हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ वाहन चोरी व एक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

रॉयल इन्फिल्ड बुलेट (एम एच 12 / जी एक्स 5543), सुझुकी जिक्सर (एम एच 14 / एफ के 4579) आणि एक वन प्लस मोबाईल फोन याबाबत निगडी पोलीस तपास करीत आहेत. आरोपी बुद्धदेव याने डेक्कन परिसरातून एक बजाज केटीएम ड्यूक ही दुचाकी चोरी केली. चोरी केल्यानंतर त्याला ती दुचाकी सुरु झाली नाही. त्यामुळे त्याने काही अंतर दुचाकी ढकलत आणली व नंतर सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला दुचाकी सुरूच झाली नाही. त्यामुळे त्याने डेक्कन ते पिंपरी-चिंचवड हा 21 किलोमीटरचा प्रवास चोरीची दुचाकी ढकलत केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी शंकर बांगर, किशोर पढेर, सतीश ढोले, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, तुषार गेंगजे, भूपेंद्र चौधरी, अमोल साळुंखे, कोंडीभाऊ वाळकोळी, मितेश यादव, उद्धव खेडकर, गोदावरी बिराजदार यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.